मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या   हिंगणघाट येथील प्राध्यापिकेच्या जळीतकांड प्रकरणाचा निकाल उद्या (5 फेब्रुवारीला) येणार आहे.  कोरोनामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबली होती. मात्र उदया या प्रकरणाचा निकाल न्यायालय सुनावणार आहे.  आता या प्रकरणातील निर्भयाला न्याय मिळणार का?  याचा  निकाल उद्या लागणार असून सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहे.


हिंगणघाट येथे  एकतर्फी प्रेमातून  पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडित प्राध्यापक तरुणीचा 10 फेब्रुवारी 2020 ला मृत्यू झाला.मृत मुलगी हिंगणघाटच्या स्व.आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. पीडित तरुणी  3 फेब्रुवारी 2020 ला सकाळी कॉलेजमध्ये जात असताना नंदोरी चौकापासून काही अंतरावर दुचाकीवर आलेल्या आरोपी विक्की नगराळेने  तिच्या अंगावर पेट्रोल फेकलं आणि तिच्या हातात पेटवलेला टेंभा फेकून तिला पेटवून दिलं. त्यानंतर लगेचच त्याने घटनास्थळवरुन पळ काढला. युवतीने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिच्या अंगावर पाणी टाकून तिचे प्राण वाचवले.   या हल्ल्यात पीडित शिक्षिकेचा चेहरा पूर्णपणे जळाला होता. श्वसननलिकेला देखील मोठी इजा झाली होती. डॉक्टरांनी वेळोवेळी शस्त्रक्रिया करुन पीडितेला वाचवण्याचा पुरेपर प्रयत्न केला होता.त्यानंतर तिच्यावर नागपुरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु झाले. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.


हिंगणघाट जळीत हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल 426  पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. 


या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. तसेच या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी झाली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होत  तर याच प्रकरणानंतर राज्यात शक्ती कायदा आणण्यात येणार असल्याचे सांगितले  होते. हिवाळी अधिवेशनात हा कायदा विधिमंडळात मंजूर सुद्धा करण्यात आला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :