औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड (Kannad) शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडलीय. कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील (Karmveer Kakasaheb Deshmukh Vidyalaya) मुलींची छेड काढणाऱ्या तरुणाला जाब विचारला म्हणून मुख्याध्यापकासह शिपायावर तलवारीनं हल्ला केल्याची घटना उघडकीस आलीय. या हल्ल्यात मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. तर, हल्लेखोर तरुणाचा शोध सुरू आहे. 


कन्नड शहरातील मक्रनपुर परिसरात कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील आहे. या ठिकाणी पहिली ते दहावीचे शाळा भरते. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू झाली. आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास एक तरूण शाळेभोवती घुटमळत होता. तो त्याचा दिनक्रम होता. प्राथमिक माहितीनुसार काही मुलींनी मुलगा त्रास देत असल्याची तक्रारही मुख्याध्यापकांकडे केली होती. त्यामुळं शाळेतील मुख्याध्यापक ए.पी.चव्हाण यांनी या मुलाला जाब विचारत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, माझा फोटो काढून माझ्या वडिलांना का पाठवला? असा प्रश्न तरूणानं मुख्यध्यापकाला विचारला. तसेच या तरूणानं मुख्यध्यापकाला आपल्या घरी येण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्याध्यापक आपल्या शिपायासोबत त्या मुलाच्या घरी जाण्यास निघाले. काही काळानंतर त्या तरुणानं त्याच्यासोबत आणलेली तलवार  काढली आणि थेट मुख्याध्यापकावर वार केले. या हल्ल्यात शिपाईदेखील जखमी झालाय, अशी माहिती पोलिसांनी दिली.


शाळेतील शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण
मुख्याध्यापक चव्हाण यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी परिसरात पसरताच पालकांनी मोठी गर्दी केली होती. तर, अचानक घडलेल्या या घटनेमुळे नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी सुध्दा लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र घडलेल्या या घटनेनंतर शाळेतील इतर शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर मुख्याध्यापकांनी शिपाई कन्नड शहर पोलीस ठाण्यात संबधित तरुणाविरोधात तक्रार दिली. तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्याध्यापक आप्पासाहेब चव्हाण आणि शिपाई संतोष जाधव यांच्या वर प्राथमिक उपचार देखील केले गेले. या घटना अत्यंत गंभीर असून अशा प्रकारच्या घटना या भय निर्माण करतात. त्यामुळं तात्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी होत आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha