औरंगाबाद : 12 महिने, 12 राशी, 12 तास आणि बाराखडी ही 12 अंकाशी जुळलेले समीकरण आता बदलणार आहे. कारण यातून बाराखडी वगळली जाणार आहे. कारण आता बाराखडी 12 अक्षरांची न राहता 14 अक्षरांची झाली आहे. म्हणजेच चौदाखडी झाली आहे.
महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने पहिलीपासून शिकवल्या जाणाऱ्या मराठी भाषेतील बाराखडी वर्णमालेत बदल केला. यापुढे मुलांना बाराखडीऐवजी चौदाखडी शिकवली जाणार आहे. मराठी शब्दोच्चारात मुलांना येणारी अडचण लक्षात घेऊन बाराखडीत ‘अॅ’ आणि ‘ऑ’ या दोन स्वरांची भर घालण्यात आली असून, त्यामुळे मराठी भाषेची बाराखडी आता चौदाखडी झाली.
इयत्ता पहिली ते पाचवीतील काही विद्यार्थ्यांना अजूनही वाचता येत नसल्याचे विविध संस्थांचे सर्वेक्षण आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत समोर आलं. त्यातच मराठी भाषेतील शुद्धलेखनाचे काही नवीन नियमही तयार करण्यात आले. या चौदाखडीमुळे विद्यार्थ्यांना तीन महिन्यांत शंभर टक्के वाचता येईल, असा दावा केला आहे. यासाठी मुलभूत वाचन क्षमता विकास कृती कार्यक्रम’ तयार केला आहे.
‘अ’ ते ‘औ’च्या बाराखडीत आता दोन नव्या स्वरांची भर घालण्यात आली आहे. सध्याच्या क्रमानुसारच्या ‘ओ’ स्वरानंतर ‘ऑ’ हा नवा स्वर येईल. त्यानंतर ‘औ’ हा स्वर येईल. ‘ए’ स्वरानंतर ‘अॅ’ या नव्या स्वराचा क्रम असेल आणि त्यानंतर ‘ऐ’ हा स्वर येईल.
मराठीत बऱ्याचशा इंग्रजी संज्ञा येत आहेत. जसे की कॅट, सॉट आपण लिहितो. ‘क’ काढून त्यावर अर्धचंद्र द्यावा लागतो. त्यामुळे ‘अ’ व ‘ऑ’ असे स्वर स्वीकारले आहेत. त्यामुळे आता बारखडी ही चौदाखडी झाली आहे. या नव्या शैक्षणिक वर्षापासून ही चौदाखडी शिकवली जाईल.
बाराखडी नव्हे, आता चौदाखडी!
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
26 Dec 2017 03:14 PM (IST)
मराठी शब्दोच्चारात मुलांना येणारी अडचण लक्षात घेऊन बाराखडीत ‘अॅ’ आणि ‘ऑ’ या दोन स्वरांची भर घालण्यात आली असून, त्यामुळे मराठी भाषेची बाराखडी आता चौदाखडी झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -