धुळे : वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे या खान्देशातील दोन नेत्यांमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली. राजकारणात जास्त बोलणाऱ्यांची काय अवस्था होते, हे आपण सर्वच पाहत आहोत, असे नाव न घेता गिरीश महाजन यांनी खडसेंसह भाजप आमदार अनिल गोटेंना टोला लगावला.   

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा मुलगा डॉ. राहुल भामरेंच्या रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजन बोलत होते.

गिरीश महाजन नेमके काय म्हणाले?

“सर्जनचे काम असते खाली मान घालून कमीत कमी बोलत सर्जरी करणे. डॉ. सुभाष भामरे हे निष्णात कँसर सर्जन आहेत. त्यांचा स्वभाव मृदभाषी आहे. राजकारणात देखील ते कमी बोलतात. कमी बोलत असल्याने त्यांना राजकारणात लॉटरी लागली. पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून येणं आणि थेट संरक्षण राज्यमंत्रिपद मिळणं, ही बाब संपूर्ण खान्देशासाठी अभिमानाची बाब आहे. राजकारणात देखील डॉ. भामरे यांनी सर्जनचा मान-सन्मान कायम राखल्यानेच त्यांना एवढा मोठा सन्मान मिळाला आहे.”, असे म्हणत गिरीश महाजन यांनी पुढे खडसेंना टोला लगावला. ते पुढे म्हणाले, “नाही तर आपण सर्व जण पाहत आहोत की, राजकारणात जास्त बोलणाऱ्यांची काय अवस्था होते.”

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांच्यासोबत भामरे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे उपस्थितांसह भाजपच्या गोटात चर्चेला उधाण आलं आहे.