Maharashtra Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिल्याने महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासाठी अत्यंत रस्सीखेच सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांचा दौरा करत महाराष्ट्रामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी चार्ज करत निवडणुकीसाठी मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे आवाहन केले. दरम्यान, दोन दिवसांचा दौरा पार पडल्यानंतर बुधवारी मध्यरात्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेत जागावाटपावर चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
150 ते 160 जागा लढवण्याचा निर्धार
या बैठकीत महायुतीमध्ये भाजपचा वाटा सर्वाधिक असणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपने या बैठकीत 150 ते 160 जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. उर्वरित जागांवर शिंदे आणि अजित पवार आणि महायुतीमधील इतर छोट्या घटक पक्षांचा समावेश असेल. दरम्यान, या बैठकीमध्ये तिन्ही पक्षांचे जे विद्यमान आमदार आहेत त्या जागा त्यांच्याकडेच राहणार आहेत. या हिशेबाने विचार केल्यास शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे 94 जागा आहेत. या जागा त्यांच्याकडे असतील. भाजपने दीडशे जागांवर लढण्याचे फायनल झाल्यास आणि शिंदे आणि अजित पवारांच्या 94 जागा पकडल्यास उर्वरित 39 जागांचा प्रथम प्रश्न निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी या तिन्ही पक्षांमध्ये या जागा एकमेकांच्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
विद्यमान आमदारांच्या जागा आहे त्यांच्याकडेच राहणार
भाजप आपल्या कोट्यातून छोट्या घटक पक्षांना जागा सोडणार आहे. आजघडीला शिंदे यांच्याकडे 40 आमदार व दहा अपक्षांसह 50 आमदार आहेत. अजित पवार गटाकडे काँग्रेसचे तीन आमदारांसह 44 आमदार आहेत. या जागा सुद्धा अजित पवार यांच्याकडेच राहतील. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे मिळून संख्याबळ 94 च्या घरात जाते. उर्वरित 39 जागांवरती चर्चेतून तोडगा काढला जाईल. दरम्यान, भाजपच्या जागा निश्चित झाल्यानंतर सीएम शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. भाजपने कोणत्याही परिस्थिती 150 जागांपेक्षा कमी जागा लढणार नसल्याचे बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आले.
अजित पवारांच्याच वाट्यालाच कमी जागा येणार!
दरम्यान, अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांच्याच वाट्याला कमी जागा येणार आहेत. त्यामुळे कमी जागा घेत अधिक जागा निवडून आणण्याचे आव्हान अजित पवारांसमोर असेल. दुसरीकडे, अजित पवार महायुतीमध्ये 19 जागांवर कोणाचा उमेदवार द्यायचा की त्याठिकाणी बंडखोरी होणार? असाही प्रश्न आहे. त्यामुळे लोकसभेतील पराभव विसरून सर्वाधिक जागा निवडून आणण्याचे टार्गेट अजित पवारांसमोर असेल.