परभणी : मागील विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपची परिस्थिती बदलली आहे. भाजपची ताकद वाढल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह विविध जिल्ह्यांमधील भाजपचे नेतेही शिवसेनेच्या जागा मागत आहेत. परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीत आम्हीच आमच्या जागा लढवणार आहोत, असा पवित्रा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे युती आणि जागा वाटपावरून जो वाद वरिष्ठ पातळीवर सुरु आहे, तोच वाद स्थानिक पातळीवरही कायम असल्याने शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


परभणी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा आमदार असला तरिही लोकसभा निवडणुकीत परभणीतून राष्ट्रवादीला 30 हजारांची लीड मिळाली होती. त्यामुळे ही जागा भाजपला सोडावी, अशी मागणी परभणी भाजप अध्यक्ष तसेच मागील वेळी पराभूत झालेले भाजपचे उमेदवार आनंद भरोसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

परभणीची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडवून घेणारच, अशी भूमिका भरोसेनी घेतली आहे. महत्वाचे म्हणजे परभणीचे शिवसेना आमदार राहुल पाटील आणि भरोसे यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळे येत्या काळात हा वाद विकोपाला जाणार हे निश्चित झाले आहे.

महत्वाचे म्हणजे मागच्या वेळी लोकसभेत शिवसेनेला 1 लाख 27 हजारांचे मताधिक्य मिळालो होते, तरीदेखील केवळ परभणी विधानसभा सोडता एकही विधानसभा शिवसेनेला जिंकता आली नाही. त्यामुळे आता परभणीबरोबरच पाथरी मतदार संघातही शिवसेनेची गोची होण्याची शक्यता आहे.

पाथरी मतदार संघातून मागील वेळी अपक्ष मोहन फड हे विजयी झाले. त्यानंतर फड यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या जागेवरूनही पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान जागावाटप जरी दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते करणार असले तरीही आपापल्या सोयीच्या जागा सुटल्या नाहीत तर परभणीत दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळेल.

दोन्ही पक्षातील मागच्या 5 वर्षात निवडणुकीचे बाशिंग बांधून बसलेले नेते बंडखोरी करणार, हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नेते जागा सोडवून घेण्याची भाषा करत आहेत, तर कोणी काहीही म्हटले तरी आम्हीच आमच्या जागा लढवणार, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.