Vidhan Parishad Election Maharashtra : नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत या दोन्ही जागांवर होणार आहे. या निवडणुकीत काही चमत्कार होणार की अपेक्षित निकाल लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषत: नागपूरच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 


काही वेळेत या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचा पाठिंबा मिळालेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात सामना आहे. तर अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांच्यासमोर भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचं आव्हान आहे. बाजोरिया यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. तर, त्यांचे वर्चस्व मोडण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर, महाविकास आघाडीने बाजोरिया यांच्या विजयाचा दावा केला आहे.  हा मतदारसंघ 1998 पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे या चारही निवडणुकीत शिवसेनेकडे मतदारांचं बहूमत नसतांनाही त्यांनी विजयाचा 'चमत्कार' घडवून आणला आहे. यातील तीन टर्म शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आता यावेळी गोपीकिशन बाजोरिया हे सलग चौथ्यांदा विजयासाठी प्रयत्नशील आहेत.


राज्याचे लक्ष नागपूरच्या निकालावर लागले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह भाजप-काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. बावनकुळे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर भाजपात धुसफूस सुरू झाली होती. भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. मात्र,  मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. फाटाफूट होऊ नये यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना नागपूरमधून बाहेर नेले होते. भाजपने या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. मतांच्या आकडेवारीनुसार भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: