Maharashtra Unseasonal Rain : उद्यापासून (सोमवार) राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि  मराठवाड्यात 13 ते 16 मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर विदर्भात 14 ते 16 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज असून यामुळे कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे. 


याआधीही मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. अशातच पुन्हा एकदा राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 16 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडू शकतो. यातच प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 


Maharashtra Unseasonal Rain : 'अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरकराने तात्काळ मदत द्यावी'


तत्पूर्वी मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडत त्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. अजित पवार विधानसभेत म्हणाले होते की, ''नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर आणि राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा,‍ लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे. वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत. शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परीणाम होणार आहे. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.'' 


विरोधी पक्षनेत्यांना उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे राज्यातील 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली होती. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते.