मुंबई: माझं सरकार वाहून गेलं नाही, ते खेकड्यांनी फोडलं अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.  ठाकरे गटाच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या आवाज कुणाचा या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा या शीर्षकाखाली घेण्यात आलेली ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रसारित होईल. बुधवारी आणि गुरुवारी सकाळी आठ वाजता अनुक्रमे पहिला आणि दुसरा भाग प्रसारित करण्यात येईल. 


उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना सडेतोड उत्तर


महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी या महाराष्ट्र गेल्या चार वर्षात अनुभवतोच आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी  2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा पुनरुच्चार केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. "आम्ही खंजीर खुपसला मग राष्ट्रवादीने काय खुपसले की तुम्ही त्यांच्यासोबत गेला" , असे उद्धव ठाकरे म्हणाले. रोज उठसूट दिल्लीला मुजरा मारणे ही आपली संस्कृती नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना टोला लगावला आहे.  


तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी पॉडकास्ट


ठाकरे गटाकडून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेलवर सुरू करण्यात आले आहे.  जनतेच्या मनातले प्रश्न त्यासोबतच महाराष्ट्राचे भविष्याचा विचार..  त्यासोबतच स्पष्ट आणि खणखणीत माहिती आता या "आवाज कुणाचा" शिवसेना ठाकरे गटाच्या पॉडकास्टमधून ऐकायला मिळतात. आगामी निवडणुकांचा विचार करता शिवसेना ठाकरे गटाची भूमिका लोकांचे प्रश्न आणि त्याची उत्तरे कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम हे सगळं या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे.


उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय


 ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यंदा वाढदिवस (Birthday) साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे (Irshalwadi Landslide) त्यांना यंदा वाढदिवस साजरा करायचा नाही असं ठरवलं आहे.या अगोदर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. शिवसैनिक त्यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मातोश्री निवासस्थानी शिवसैनिक जमा होतात मात्र यंदा इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या वाढदिवसाला कोणीही मातोश्री निवासस्थानी येऊ नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. तसंच या दिवशी कोणते तरी सामाजिक उपक्रम राबवावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.