Maharashtra Rain : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळं शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यातील नागरिकांना या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  


आजचा पावसाचा अंदाज


राज्यात सध्या पावसाची जोरदार बँटिंग सुरु आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडं संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.   


लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, लातूर-जहिराबाद महामार्गावरील पूल गेला वाहून


लातूरसह जिल्ह्याभरात आज पावसाची तुफान हजेरी लागल्याचं दिसून आलं. औराद शहाजानी परिसरात संध्याकाळी जोरदार पाऊस पडला असून दीड तासात 60 मिमी पावसाची नोंद झाली. लातूर-जहिराबाद महामार्गावरील पूल वाहून गेल्याने तीन तासांसाठी वाहतूक बंद होती. अनेक गावांना जोडणाऱ्या छोट्या मोठ्या पुलावरूनही पाणी आल्याने तीन ते चार तास वाहतूक ठप्प होती. लातूर- जहिराबाद महामार्गावरील शेजारील कर्नाटक हद्दीतील जामखंडी येथील पर्यायी पूल वाहून गेला. त्यासोबतच औराद शहाजनी परिसरातील तगरखेडा, हालसी, सावरी, बोरसुरी गावांतील ओढ्याच्या पुलावर पाणी आल्याने या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले झाले होते. औराद शहाजानी ,तगरखेडा, हालसी, सावरी, बोरसुरी या भागातील नागरिकांनी शेतकरी हे वाहतूक बंद असल्याने अडकून पडले होते.


पावसामुळं यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार हेक्टरवरील पिकांना फटका


यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडं शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे. सततचा पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार हेक्टरवरील शेतजमीन आणि पिके बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यास युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लाखात असून मिळणारी मदत ही हजारात आहे. मात्र, ही मदत कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


हिंगोली दिल्ह्यात जोरदार पाऊस


दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली शहर कळमनुरी यासह जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेती पिकांना मोठा फायदा होणार आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी सुद्धा साचले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 332 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरीच्या एकूण 41 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Latur Rain : दीड तासात 60 मिमी पाऊस... . महाराष्ट्र-कर्नाटकाला जोडणारा पर्यायी पूल गेला वाहून