Udayanraje Bhosle : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी (Governor Bhagat Singh Koshyari ) छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी (controversial statement) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ( Udayanraje Bhosle) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची आज भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजपच्या खासदारांसोबत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयाला (PMO) पत्र पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. 


राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्याबाबत जनतेमध्ये असंतोष
उदयनराजे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे, शिवभक्त नाराज आहेत. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं योग्य नव्हे, या मुद्द्याकडे राजकीय नजरेतून पाहू नये अशी आशा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काढलेल्या उदगाराबाबत राष्ट्रपतींना दिलेल्या पत्राची दखल घेण्यात आली आहे. आज पीएमओला उदयनराजे यांच्याकडून आणखी एक पत्र देण्यात आले आहे, असं उदयनराजे म्हणाले. आता पुढील कारवाई प्रक्रियेनुसार होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्यपालांनी अजून माफी मागितली नाही याची खंत वाटते असंही ते म्हणाले.


पंतप्रधानांना याची तीव्रता माहिती आहे. - उदयनराजे


राज्यपालांच्या वक्तव्याबाबत जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला असून राज्यपालांच्या वक्तव्याबाबत भाजप जबाबदार नाही. या संदर्भात 23 नोव्हेंबरला राष्ट्रपतींना देखील पत्र लिहिलं होतं. राष्ट्रपतींनी आधीच दखल घेतली आहे. आजही प्रक्रियेनुसार पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं आहे, तसेच मोदींकडे आमची भूमिका पोहचली आहे, तसेच पंतप्रधानांना याची तीव्रता माहिती आहे. असं उदयनराजे म्हणाले. 


महाविकास आघाडीच्या मोर्चात उदयनराजे सहभागी होणार का?


राज्यपालांविरोधातल्या मविआच्या मोर्चासाठी समर्थनाबाबतही त्यांनी इशारा दिला. मात्र स्पष्ट बोलून दाखवले नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या मोर्चात उदयनराजे सहभागी होणार का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दरम्यान आज झालेल्या बैठकीत सर्व खासदारांचं एकमत झालं आहे. असंही उदयनराजे म्हणाले आहेत.


सीमावादावर उदयनराजेंची प्रतिक्रिया
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन वातावरण तापलं असतानाच उदयनराजेंना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा ते म्हणाले, केंद्राने महाराष्ट्र-कर्नाटकबाबत समन्वय साधला पाहिजे असं म्हणाले. 


महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध


मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी अनेक वक्तव्य करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करणारं विधान केलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. 'समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय?' असं विधान कोश्यारी यांनी केलं. औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये त्यांचा निषेध करण्यात आला. राज्यपालांना हटवा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.


13 डिसेंबरला पुणे बंदची हाक
राज्यपाल भगतसिंह कोशारींनी (Bhagat Singh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत (Chatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. पुण्यातील सर्व पक्षांनी आणि विविध संघटनांनी ही बंदची हाक दिली आहे. 13 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे.