पुणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना-भाजप युती करण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेना-भाजप युती व्हावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. मात्र आमचं स्पष्ट मत आहे की, शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना काय उत्तर द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे.
आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत. सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो, पण बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भाजप स्वबळावरच लढत आहे. कुणी कोणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे हे त्यांनी ठरवायचे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला. आता कुणासोबत कुणी जायचं त्यांनी ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते फोडतायेत; आमदार प्रताप सरनाईक यांचा 'लेटरबॉम्ब'
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केलं आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा बॉम्ब सरनाईक यांनी या पत्रातून टाकला आहे. केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी काही मंत्र्यांची केंद्राशी हातमिळवणी सुरु आहे, असा आरोपही शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केला आहे. एबीपी माझाच्या हाती हे पत्र लागलं असून प्रताप सरनाईक यांनी 10 जून रोजी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं.
एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष “एकला चलो रे" ची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे.