मध्यरात्री खेडच्या बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.. अनेक लोकांच्या घरात पावसाचं पाणीही शिरलं होतं.. जिल्ह्यातल्या सर्वच नद्या दुथडी भरून वाहताहेत.. तर मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलाय. यामुळे खेड शहराला २००५ च्या प्रलयाची आठवण झाली.
काल सायंकाळ नंतर खेड चिपळूण मंडणगड परिसरात पावसाचा जोर वाढत गेला आणि अवघ्या काही तासात खेडच्या परिसरात २९७ मीमी अशी रेकॉर्ड पावसाची नोंद झाली. मध्यरात्री खेड शहर परिसरात काही फुटपर्यंत पाणी वाढलं आणि खेडमधील नागरिक आणि व्यापारी वर्गाची मोठी धावपळ उडाली.
याच दरम्यान पुराचे पाणी कधी नव्हे ते जगबुडी नदीच्या पुलावर आल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक १२ तासासाठी बंद ठेवावी लागली. पुराच्या पाण्याचा जोर इतका होता की या पाण्याने महामार्गावरील जगबुडीच्या पुलावरील लोखंडी रेलिंग अनेक ठिकाणी वाहून गेली.
यामुळे आता महामार्गावरील एकमेव पर्याय असलेल्या या पुलावर प्रशासन आणि यंत्रणेला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. मध्यरात्री चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातही दरड कोसळल्याने इथेही रात्रभर महामार्ग बंद ठेवावा लागला इथे काही प्रमाणात चिपळूण शहरातून वाहतूक कराड मार्गावर वळवण्यात आली.
कोकण किनारपट्टीत पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय. राजापूर, लांजा, रत्नागिरी या संपूर्ण भागात अजूनही पाऊस सुरु आहे.
गेले चार दिवस सुरु असलेल्या या पावसाने अवघा कोकण जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे . सर्वच भागातील नद्यांनी आपली नेहमीची पातळी ओलांडली असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
प्रशासनाने मच्छिमारांनाही खोल समुद्रात न जाण्याचा सूचना दिल्या आहेत.