मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलीस आज नाना पटोले यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलीस आज नाना पटोले यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहेत. पुणे पोलीस मुंबईत येऊन स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहेत. काग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान नावाने नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यांत आला होता.
आमदार रोहित पवार आज अयोध्येला जाणार
राष्ट्रवादीचे रोहित पवार आद अयोध्या धामला भेट देणार आहेत. रोहित पवार हनुमान गढी आणि कनक भवनलाही आज भेट देणार आहेत.
ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपच्या ओबीसी मोर्चाची कार्यकारणीची बैठक
ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपच्या ओबीसी मोर्चाची कार्यकारणीची बैठक आज वसंत स्मृती दादर येथे होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
खासदार नवनीत राणा अजूनही लीलावती रुग्णालयात
अपक्ष खासदार नवनीत राणा सध्या जामीन मिळाल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. बुधवारी जामीन मिळाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना हरियाणामध्ये ठेवण्याची पंजाब सरकारची विनंती हायकोर्टाने फेटाळली, कोर्ट आज सुनावणी करणार
भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना ताब्यात न देण्याची आणि त्यांना हरियाणात न ठेवण्याची पंजाब सरकारची दिल्ली पोलिसांची विनंती पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. यावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.
झारखंडच्या खाण सचिव पूजा सिंघल यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे, कोट्यवधींची मालमत्ता जप्त, आजही छापे सुरू राहू शकतात
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पथक शुक्रवारी सकाळपासून झारखंड केडरच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि राज्याच्या विद्यमान खाण सचिव पूजा सिंघल यांच्या घरावर आणि तिच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर छापे टाकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 15 कोटींहून अधिक किमतीचे रोख दागिने आणि गुन्ह्याची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. छाप्यादरम्यान या घोटाळ्यातील धागे दोरे झारखंडच्या काही राजकारण्यांपर्यंत पोहोचू शकतात, असे संकेतही मिळाले आहेत.
राहुल गांधी आज हैदराबादमधील गांधी भवनात पक्षाच्या नेत्यांची बैठक घेणार
काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी आज हैदराबादमधील गांधी भवनात पक्षाच्या नेत्यांची बैठक घेणार असून इतर अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत.
गडू घागरीचे तेल आज बद्रीनाथला पोहोचणार
भगवान बद्रीविशालच्या दैनंदिन अभिषेकासाठी वापरण्यात येणारे तिळाचे गडू घागरी तेल कलश यात्रा लक्ष्मी नारायण मंदिर डिमर येथून पायी चालत कर्णप्रयागला पोहोचली. यादरम्यान भाविकांनी भगवान बद्रीविशालला तिलक लावून दर्शन घेतले. 8 मे रोजी दरवाजे उघडण्यापूर्वी भगवान बद्रीविशालच्या गर्भगृहात हे तिळाचे तेल स्थापित केले जाईल.
श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून पुन्हा आणीबाणी
गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून पुन्हा एकदा आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या मीडिया विभागाचा हवाला देत श्रीलंकन माध्यमांनी ही माहिती दिली.
रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस
देशाच्या साहित्य विश्वासाठी 7 मे हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला आहे. कवी, लघुकथा लेखक, गीतकार, संगीतकार, नाटककार, निबंध लेखक आणि चित्रकार म्हणून इतिहासातील युगपुरुषाचा दर्जा असलेले गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. भारतीय संस्कृतीची पाश्चात्य जगाला ओळख करून देण्याचे श्रेय त्यांना जाते.
1907 : पहिली इलेक्ट्रिक ट्राम कार मुंबईत दाखल झाली
1912 : कोलंबिया विद्यापीठाने विविध श्रेणींमध्ये पुलित्झर पुरस्कार प्रदान करण्याच्या योजनेला आजच्या दिवशी म्हणजे 7 मे 1912 मान्यता दिली. जोसेफ पुलित्झर यांनी त्याची स्थापना केली होती.
आज आयपीएलमध्ये डबल धमाका
शनिवारी आयपीएलमध्ये डबल धमाका असणार आहे. दुपारी पंजाब आणि राजस्थान यांच्यात रॉयल सामना होणार आहे. तर संध्याकाळी लखनौचे नवाब कोलकात्यासोबत भिडणार आहेत. पुण्याच्या एमसीए मैदानावर लखनौ आणि कोलकाता यांच्यात सामना रंगणार आहे. तर वानखेडे स्टेडिअमवर दुपारी पंजाबच्या किंग्ससमोर राजस्थानचे रॉयल आव्हान असणार आहे.