Maharashtra Temperature : राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीने (Hail Storm) तडाखा दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. परंतु आता राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार आहे. राज्यातील तापमान 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. आज (8 मार्च) आणि उद्या (9 मार्च) कोकणात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागात उष्माघाताचा इशारा दिला आहे.


फेब्रुवारी महिन्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली होती. अंगाची लाहीलाही होत असतानाच 5 ते 8 मार्च दरम्यान राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. परंतु पिकांचं मोठं नुकसान झालं. आता पुन्हा एकदा उकाडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ दिसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दुसरीकडे विदर्भात मात्र काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


राज्यात यावर्षी तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज 


यावर्षी राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरला. उर्वरित तीन महिने देखील असेच तापदायक राहतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्यांदरम्यानगुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


दरम्यान संभाव्य उष्माघातासाठी काय करावे, काय करु नये, याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.



  • उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि अति उष्णता असल्यानंतर जेवण तयार करु नका.

  • विशेष करुन दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका.

  • सतत पाणी पीत राहा जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल.

  • ओरल रिहायड्रेशन सॉल्यूशन (ओआरएस) याचा वापर करा.

  • त्याशिवाय घरात तयार केलेले लिंबू-पाणी, छास, लस्सी, ज्यूस याचं जास्तीत जास्त सेवन करा.

  • घरातून दुपारच्या वेळी बाहेर येऊ नका. टरबूज, कलिंगड, संत्रा यासारख्या फळांचं सेवन करा.

  • तसेच सुती कपडे परिधान करा. गडद रंगाचे कपडे परिधान करु नका. उन्हात जाताना डोकं झाका.