Maharashtra Temperature : राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरतेय. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचलाय. फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरलाय. पुढील तीन महिने देखील असेच तापदायक राहतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय. मार्च ते मे महिन्यांदरम्यानगुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


ला निनानंतर वाढत चाललेला अल निनोचा प्रभाव पाहता 2023 वर्ष सुद्धा उष्ण लहरींचे आणि अधिक तापमानवाढीचे राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या तापमानाचा फटका पिकांना देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न होत असताना महागाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रात  अंगाची लाहीलाही होणार आहे . राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.  महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता देखील वर्तवली आहे. उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा अनुभव येणार असून तापमान 40 अंशांपार जाण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


मागच्या वर्षी विदर्भ, मराठवाड्यात अनेकदा उष्णतेच्या लाटा बघायला मिळाल्या. ज्यात अनेक शहरांमधील तापमान हे 45 अंशांपार गेल्याचं चित्र होतं. उष्णतेच्या लाटा थेट जूनपर्यंत अनुभवायला मिळाल्या होत्या. ज्यात अधिक तापमान आणि उषाणतेच्या लाटा उन्हाळ्यातील 120 दिवसांपैकी 30 दिवस होत्या. हा गेल्या 50 वर्षातला विक्रम होता. त्यामुळे यंदा भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरल्यास उन्हाचे चटके अधिक प्रमाणात सहन करावे लागणार आहेत. 1877  साली फेब्रुवारीत सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आली होती, त्यानंतर फेब्रुवारी 2023 हा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरलाय. घटलेली चक्रीवादळांची संख्या, त्यामुळे झालेला मर्यादित पाऊस ही फेब्रुवारीतील उष्णतेची प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं जातंय. 


एकीकडे मार्चमध्ये काढणीला आलेल्या पिकांवर उष्णतेच्या माऱ्यामुळे होरपळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अल निनोचाप्रभाव वाढत असल्यानं यंदा दुष्काळाची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे एकीकडे वाढतं तापमान आणि उष्णतेच्या लाटा आणि दुसरीकडे यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्याचं कमी होणारं प्रमाण चिंतेचा विषय ठरु शकतो. 


 आणखी वाचा :


Heat Wave in India : फेब्रुवारीतच उष्णतेची लाट, 122 वर्षांचा विक्रम मोडला; सरासरी तापमान 29.5 डिग्री