Maharashtra Temperature Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. राज्यात भयंकर थंडी आणि गारठा वाढलाय. उत्तरेकडील शीत लहरींमुळे राज्यात पुढील चार दिवसांसाठी थंडीची लाट राहणार असल्याचे हवामान विभागांने सांगितलंय. हाडं गोठवणाऱ्या थंडीने नागरिक हैराण झाले आहेत . दरम्यान आज महाबळेश्वर पेक्षाही पुण्यात कमी तापमान आहे . तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला असून प्रचंड धुक्यामुळे सोलापुरातील विमानसेवा उद्घाटनही पुढे ढकळण्यात आले आहे .


राज्यभरात पहाटेच्या वेळी नीचांकी   तापमानाच्या नोंदी होत असून किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते सहा अंशापर्यंत खाली घसरल्याचं दिसून येत आहे .आज महाबळेश्वर मध्ये 13.5 अंश तापमान होतं .तर पुण्याचा पारा 7.8 अंश सेल्सिअसवर होता. यात NDA परिसरात 6.1° वर तापमान होतं . राज्यात थंडीचा कडाका वाढत असून पुणे, नाशिक आणि लातूरसह अनेक भागांत तापमानाची घसरगुंडी झालीय. पुण्याचं तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी झालं असून सोलापूरमध्ये धुक्यामुळे विमानसेवेच्या उद्घाटनावर पाणी फेरले आहे. देशात उत्तरेतून येणाऱ्या शीत लहरी आता आणखी तीव्र झाल्या आहेत. जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये शुन्याखाली तापमान गेलं आहे. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्रासह विदर्भ,मराठवाड्यात तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा (Cold Wave Alert) दिला आहे. येत्या 24 तासांत राज्यात 3 ते 5 अंशांनी तापमान घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


लातूर जिल्ह्यात गारठा कायम


लातूर जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे लातूर जिल्ह्यात कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. औराद शहाजानी येथे थंडीने कहर केला असून आज सकाळी साडेसात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील काही दिवसांतील तापमानाच्या नोंदींनुसार थंडीचा जोर अधिक वाढताना दिसतो:


12 डिसेंबर: 14 अंश सेल्सिअस


13 डिसेंबर: 11 अंश सेल्सिअस


14 डिसेंबर: 11 अंश सेल्सिअस


15 डिसेंबर: 8 अंश सेल्सिअस


16 डिसेंबर: 6 अंश सेल्सिअस


17 डिसेंबर: 7.5 अंश सेल्सिअस


नाशिक जिल्ह्यात तापमानात घट


नाशिक जिल्ह्यातही थंडीचा मुक्काम कायम आहे. निफाड तालुक्यात तापमान 5.7 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर नाशिक शहरात 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.


राज्यातील 10 अंश खाली तापमान असलेले भाग:


अहमदनगर: 5.6


सातारा: 9.1


नाशिक: 8


संभाजीनगर: 10


बारामती: 7.8


नांदेड: 8.6


मालेगाव: 9.8


पुणे: 9


नागपूर: 8.2


जेऊर: 5.5


परभणी: 9.4


जळगाव: 8.3


गोंदिया: 8.2


वर्धा: 9.5


सोलापूर विमानसेवा पुढे ढकलली


सोलापूर-गोवा आणि सोलापूर-मुंबई विमानसेवेचे 23 डिसेंबरला होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. धुक्यामुळे उड्डाण सुरळीत होऊ शकणार नसल्याचे "फ्लाय 91" कंपनीने स्पष्ट केले. कंपनीने डिसेंबर अखेर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत हा निर्णय लागू असेल असे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वी सोलापूर विमानतळाचे लोकार्पण केले होते. मात्र विमानसेवा अद्याप सुरू न झाल्याने सोलापूरकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.


हेही वाचा:


Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट