मुंबई : माजी खासदार निलेश राणेंकडून मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून सिंधुदुर्गातील 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'च्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. ऐन निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. कार्यकर्त्यांमधील नाराजी पक्षाला भोवण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

कुडाळ तालुक्यातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले. या राजीनामा नाट्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.

खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शुक्रवारी कुडाळ महाराष्ट्र स्वाभिमान कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी काही जणांना त्यांनी कानपिचक्या दिल्याचंही बोललं जात आहे. त्यातच तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्याकडे पाठवले. सामंत यांच्यामार्फत ते थेट पक्षश्रेष्ठींकडे धाडण्यात आले.

तडकाफडकी राजीनाम्यांच्या नेमक्या कारणांचा उलगडा झालेला नसला तरी पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. पदाधिकाऱ्यांनी याबाबत वाच्यता करणं टाळलं असलं तरी राजीनामा प्रकरणाला दुजोरा दिला आहे.

कार्यबाहुल्यामुळे आम्हाला पक्ष संघटनेला वेळ देता येत नाही अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतली. स्वतःची पदरमोड करुन काम करतो, मात्र आम्हाला काही जणांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर पदावर राहणे काय कामाचे? अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच अचानकपणे सर्वांनी सामूहिक राजीनामे देण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला.

पक्षश्रेष्ठींकडे काही जणांनी चुकीची माहिती पसरवून प्रामाणिक काम करत असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही होत आहे. कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता थेट बोलणी खावी लागत असल्याने 'स्वाभिमान'मधील काही कार्यकर्ते दुखावले आहेत. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

अंतर्गत गटबाजीमुळे होत असलेली घुसमट सहन करुन किती दिवस राहायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यातूनच या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं बोललं जात आहे. या राजीनामा प्रकरणाने स्वाभिमानच्या गोटात एकच खळबळ उडाली असून याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

पडते-कुडाळकरांनी साथ सोडली

नारायण राणे यांचे जवळचे शिलेदार संजय पडते व काका कुडाळकर यांनी यापूर्वीच राणे यांची साथ सोडली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राणे यांच्या स्वाभिमानमधील कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर्गत गटबाजीने नाराजी वाढली आहे