Maharashtra News : मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra State Cabinet Meet) आणखी एक धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे. हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून 6 हजार किमी रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेअंतर्गत 6 हजार किमी रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये 30 टक्के शासनाचा सहभाग आणि 70 टक्के एमएसआयडीसीचा उद्योजक म्हणून सहभाग असेल.  


हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून 6 हजार किमी रस्त्यांची कामे


सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून 6 हजार किमी रस्त्यांची कामे घेण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. हे रस्ते सिमेंट कॉक्रीटचे असतील आणि यासाठी 28 हजार 500 कोटी खर्चाला देखील मान्यता देण्यात आली आहे. 


22 पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात प्रकल्प


हायब्रिड ॲन्युईटी मॉडेल हे खाजगी क्षेत्र सहभागाचे मॉडेल असून केंद्राच्या धर्तीवर मार्च 2017 पासून हे कार्यान्वित करण्यात आले आहे.  रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज अशा विविध 22 पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात प्रकल्प राबविणे तसेच निधी उभारणे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येईल. यामध्ये शासनाचा सहभाग 30 टक्के आणि एमएसआयडीसीचा उद्योजक म्हणून सहभाग 70 टक्के असेल.  


या योजनेतील सर्व कामे ईपीसी तत्वावर राबविण्यात येणार असून यासाठी 2.5 वर्षे बांधकाम कालावधी तर 5 वर्षे दोषदायित्व कालावधी निश्चित करण्यात आला आहे. कामाचा प्राधान्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग निश्चित करणार आहे. 


शिंदे कॅबिनेटचे 20 मोठे निर्णय


 1. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही (नगरविकास विभाग) 


2. राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. 2 लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.


3. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार


4. राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार


5. उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार


6. मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार. मध उद्योगाला बळकटी 


7. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी


8. बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार, मूलभूत सुविधा देणार


9. शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी


10. धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार


11. सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते


12. स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता


13. बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य.  पतसंस्थांना मजबूत करणार


14. कोंढाणे लघु प्रकलपाच्या कामास जादा खर्चास मान्यता


15. तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार


16. नांदेडच्या गुरुद्धारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम


17. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार


18. कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष


19. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय


20. गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra : शासकीय कंत्राटदार सरंक्षण कायद्यासाठी कर्मचारी आक्रमक; फेब्रुवारी, मार्चमध्ये विकासकामं बंद करण्याचा इशारा