मुंबई : दिवसेंदिवस मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचे आकडे वाढत आहेत. ही परिस्थिती कधीपर्यंत थांबेल याबाबत अद्याप तरी काहीच माहिती नाही. त्यामुळे अशाही परिस्थितीत आपली सेवा बजावत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन खात्यातील कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची परिवहन खात्यातर्फे वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. जे कर्मचारी कोरोना बाधित सापडतील त्यांना रुग्णालयात तत्काळ भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत. अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


याबाबतचे पत्र देखील संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी राज्य परिवहन खात्याचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहे. जर आमची मागणी मान्य झाली नाही आणि एखादा कर्मचारी कोरोना बाधित झाला तर ही सर्वस्वी जबाबदारी एस.टी. महामंडळाची असेल असं देखील शिंदे यांनी म्हटलं आहे.


याबाबत बोलताना महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, मागील चार महिन्यांपासून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात वाढत आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची कोव्हिड-19ची टेस्ट आणि प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे आहे. सध्या काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली तर यामुळे इतर कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर अत्यावश्यक सेवेत सध्या जे कर्मचारी आणि अधिकारी कामावर आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणी होणं गरजेचं आहे.


मुंबईतील नेहरू नगर येथील एसटी डेपोतील तब्बल 13 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
यासोबतचं ज्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळतील त्यांची कोव्हिड 19ची टेस्ट होणं गरजेचं आहे. नुकतीच मुंबईतील नेहरू नगर येथील एसटी डेपोतील तब्बल 13 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण आहे. हे कर्मचारी ज्या इतर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले. ते सध्या प्रचंड तणावाखाली आहेत. आशा या तणाव सदृश वातावरणात कर्मचाऱ्यांना काम करणे मोठ्या जिकरीचे होऊन बसले आहे. त्यामुळे परिवहन खात्याने ही गंभीर बाब लक्षात घेत लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावी. वैद्यकीय तपासणी केल्यावर कमीतकमी हे कर्मचारी तणावातून बाहेर येथील आणि आपली कामं व्यवस्थित करु शकतील.


खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधितांची होणारी लूट थांबवण्यासाठी पॉझिटिव्ह रिपोर्ट थेट देणं बंद केलं - बीएमसी


अधिकाऱ्यांनाही विमा कवचं द्यावं
नुकतेच परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी राज्य परिवहन खात्यातील कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण दिले आहे. हे विमा संरक्षण कामावर असलेल्या अधिकाऱ्यांना देखील देण्यात यावे अशी देखील मागणी महाराष्ट्र स्टेस्ट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे. अधिकारी देखील आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांना देखील विमा संरक्षण द्यावे असं संघटनेचं म्हणणं आहे. जर विमा संरक्षण आणि वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही तर कर्मचारी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, असा देखील इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.


Solapur & Kolhapur | सोलापुरात लालपरी धावली, तर कोल्हापुरात कामकाजासाठी विद्यापीठ खुलं