ST Workers Strike : राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तिढा सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं पर्याय द्यावेत असही परबांनी म्हटलं आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला आहे. सरकारच्या प्रस्तावावर शिष्टमंडळ चर्चा करुन आज सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे. हा प्रस्ताव मान्य करावा आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी विनंती मंत्री अनिल परब यांनी केली आहे. 


बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही सांगितलं आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत, असंही पडळकर यावेळी म्हणाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही पडळकर यांनी सांगितलं आहे. तसेच, आम्ही पोटतिडकीनं आमची बाजू मांडली. राज्यातील निलंबित झालेला कर्मचारी आहे, तो आझाद मैदान येथे येणार आहे. आज सरकारनं विलनिकरण करणाची भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे, असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सांगितलं. 


कालच्या बैठकीनंतर काय म्हणाले परिवहन मंत्री अनिल परब? 


जो पर्यंत यामध्ये काही तोडगा निघत नाही तोपर्यंत दुसरे काही पर्याय असतील तर एसटी कर्मचाऱ्यांनी द्यावा असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. चर्चा सकारात्मक झाली असून या प्रश्नी आज सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे. एसटीचे राज्य शासनाच्या सेवेमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. एसटी विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असून त्यावर एक समिती स्थापन केली आहे. या समितीने 12 आठवड्यात आपला अहवाल द्यायचा आहे. समितीचा जो काही अहवाल असेल, तो राज्य सरकारला मान्य असेल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 


परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळ यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह संपाबाबत बैठक पार पडली. या बैठकीस सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतन वाढ आणि महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन, संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील लाखो नागरिकांची गैरसोय होत आहे. 


दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली. त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याचं स्पष्ट झालं असून यावरची पुढची सुनावणी आता 20 डिसेंबरला होणार आहे. यावर राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतूनही काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे हा संप आता पुढचा महिनाभर सुरु राहतोय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. 


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा



महत्त्वाच्या इतर बातम्या :