Andhra Pradesh Rains : आंध्र प्रदेशात शुक्रवारी रायलसीमाच्या तीन जिल्ह्यांमध्ये आणि एका दक्षिण किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये 20 सेंटीमीटरपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसानं आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. कडप्पा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12 जण बेपत्ता झाले आहेत. वायुसेना, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात आलं आहे. 


पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संवाद 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. तसेच आंध्र प्रदेशातील पूरस्थितीचा आढावाही घेऊन सर्वोतोपरी मदत देण्याचं आश्वासनही दिलं. मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आज पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. 


मुसळधार पावसानं नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावं पुरानं वेढली गेली आहेत. रस्त्यांना नद्यांचं रुप आलं आहे. काही ठिकाणी तर रस्तेही वाहून गेले आहेत. पूर्ण शहरात पाणीच पाणी झालंय. वीजपुरवठाही बंद करण्यात आला आहे. अनेक रस्ते बंद झाले आहेत. तिरुमाला डोंगरांवरुन वाहणाऱ्या पाण्याचंही रौद्ररुप पाहायला मिळतंय. तिरुपती-हैदराबाद मार्गावर वाहतुकीसाठी अडथळे येऊ लागले आहेत.


पीटीआय या वृत्तसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अन्नामय्या परियोजनेतील बांध तुटल्यामुळे अचानक पूर आला आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शिवमंदिरात पूजा करण्यासाठी गेलेले भाविक अचानक आलेल्या पूरामुळे अडकले आणि वाहून गेले आहे. बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी बचाव अभियान सुरु केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)ने राज्याला पूराचा इशारा दिला असून आंध्रप्रदेशात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 


दरम्यान, शुक्रवारी रेनिगुंटामध्ये तिरुपती आंतरराष्ट्रीय विमानतळ खुलं करण्यात आलं. परंतु, तिरुमाला डोंगररांगांमधून जाणारे दोन घाट रस्ते अद्याप बंदच आहेत. अलीपिरी ते तिरुमला या टेरेस्ड रस्त्याचे भूस्खलन आणि पुरामुळं मोठं नुकसान झालं असून तो बंद करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार, अनंतपुरम, कडप्पा जिल्ह्यांमध्ये महापूर