मुंबई : मागील काही दिवसांत सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणूस हैराण असताना आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत आज तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय झाला आहे.
एसटी प्रति किलोमीटर 21 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. पूर्वी प्रतिकिलोमीटर 1 रुपया 24 पैसे दर, आता प्रतिकिलोमीटर 1 रुपया 45 पैसे मोजावे लागणार. बैठकीत तिकीट दरात 17.17 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीटाचे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर 5 ते 10 रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.
गेल्या तीन वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच 6 किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ 5 रुपयाच्या पटीत असून 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
साध्या बसेसचे तिकिट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकिट दराच्या तुलनेत 18 टक्के जास्त होते. उदयापासून सदर अतिरिक्त दर रद्द करण्यात आले असून दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचा तिकिट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे.