दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 89.56 %
एबीपी माझा वेब टीम | 05 Jun 2016 11:30 AM (IST)
पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेरी संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.56 टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्या निकालातही 91.41 टक्क्यांसह मुलींनी बाजी मारली आहे. तर मुलांचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे 51,281 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर विभागनिहाय निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.56 टक्के लागला असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. तर 15 जूनला दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत मिळतील. तसंच 18 जुलै रोजी दहावीची फेरपरीक्षा होईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. राज्याचा विभागनिहाय निकाल कोकण- 96.56% कोल्हापूर- 93.89 % पुणे- 93.30 % मुंबई- 91.90 % नाशिक- 89.61 % औरंगाबाद- 88.05 नागपूर- 85.34 % अमरावती- 84.99 % लातूर- 81.54 %