सोलापूर : सोशल मिडीयामुळे अनेकांना स्टार बनवलं. गाव-खेड्यातील मुलांच्या कलांना या सोशल मीडीयाने व्यासपीठ दिलं. या आधारवर सोलापूर मोहोळच्या गणेश शिंदेचे युट्यूबवर आज तब्बल पावणे सात लाख सबस्क्रायबर आहेत तर इन्स्टाग्रामवर देखील लाखाहून अधिक फॉलोअर्स आहे. केवळ इतकचं नाही तर युट्यूबमुळं गणेशचं अख्ख आयुष्यचं बदलून गेलंय. मात्र आता याच गणेशवर टीका होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी बायकोच्या बाळंतपणासाठी पैसे नसणाऱ्याकडे अचानक कसे पैसे आले? असा आरोप गणेश शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमध्ये भल्याभल्यांच्या रोजगारावर गदा आली. व्यवसाय करणारा गणेश देखील त्याला अपवाद ठरला नाही. युट्यूबवर व्हिडीओ बनवणं सुरु होतं. त्यातून पैसे मिळतात हे मात्र ठाऊक नाही. बायकोची बाळंतणासाठी देखील पैसे नाहीत अशा काळात युट्यूबच्या याच चाहत्यांनी त्यांना नवीन जीवन दिलं. युट्यूबच्या माध्यमातून गणेश शिंदेचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या आता स्थिरावले आहे. या माध्यामातून मिळणाऱ्या पैशातून त्यानं घर बांधले. घरात साजेल असं फर्निचर देखील खरेदी केलं इतकचं काय तर काही दिवसांपूर्वी त्याने चारचाकी वाहनाची खरेदी देखील केली. मात्र काही महिन्यांपूर्वी बायकोच्या बाळंतपणासाठी पैसे नसणाऱ्याकडे इतका पैसा कसा आला असे म्हणत काही जण त्यांना ट्रोल करत आहेत तर काही जण फोन करुन धमक्या देखील देत आहेत. या सर्व आरोपांवर गणेशने स्पष्टीकरण देखील आहे.
गणेश शिंदे म्हणाला, युट्यूबवरून हे पैसे कमावले आहे. युट्यूब व्हीडिओला मिळणाऱ्या जाहिरातींमधून आम्ही पैसे कमावले. त्यातूनही पैसे मिळतात ते पैसे साठवून त्यातून आम्ही कार घेतली आहे. आपल्यावर होणाऱ्या टीकांमुळे न खचता गणेश दर एक दोन दिवसाला एखादा तरी व्हिडीओ बनवत आहे. व्हिडीओचा लेखक, कॅमेरामन, दिग्दर्शक आणि कलाकार देखील गणेश आहे. गणेशच्या या यशाचा त्याच्या गावकऱ्यांना मित्रांना देखील हेवा वाटतो. गणेशने युट्यूबवर चॅनेल सुरु करताच त्याला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला. गणेशच्या व्हिडीओमध्ये सर्वात लोकप्रिय कलाकार अवघ्या साडे तीन वर्षाची शिवानी आहे.
गणेशने तयार केलेल्या व्हिडीओंमध्ये कुठलाही बिभस्तपणा नाही. विनोदाच्या नावावर केलेल्या अश्लीलपणा देखील नाही. ग्रामीण मातीतला सुगंध गणेश आणि योगिता यांनी तयार केलेल्या व्हिडिओत आहे. नेमकं हेच लोकांना आवडत आहे. युट्यूबच्या कृपेने गणेशसारख्या अनेकांना नवीन वाटा आता दिसू लागल्या आहेत.