सोलापूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक शहरात कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातही  वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.  आठवड्यातील शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. 

राज्यात कोरोनानं डोकं पुन्हा वर काढल आहे. राज्यात काल (बुधवारी 25 मार्च) विक्रमी 31 हजार 855 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. हा आकडा सर्वांच्या चिंता वाढवणारा आहे.  मुंबई, पुणे नागपुरसह अनेक जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.  महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळं सोलापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वीकेंड  लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे.

शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवशी सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत व्यवसाय करण्यास मुभा असणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आठवडी आणि जनावर बाजार देखील बंद राहणार आहेत.  सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु राहतील. सर्व धार्मिक विधीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नसेल. असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेत आहेत. 

दरम्यान हा वीकेंड  लॉकडाऊन केवळ अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानांसाठी लागू असणार आहे. नागरिकांसाठी अगोदर जारी केलेल्या आदेशानुसार केवळ रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले आहेत. 

संबंधित बातम्या :

Maharashtra Covid19 Update | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, आज 35 हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद, तर 111 रुग्णांचा मृत्यू