Dhananjay Munde : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त समजत आहे. मुंडे यांना तातडीने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुंडे काल परभणीला गेले होते. त्यानंतर आज त्यांचा जनता दरबार होता. 


मुंडे यांची प्रकृती स्थिर - आरोग्यमंत्री 


मंत्री धनंजय मुंडे याना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त समजताच आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील रुग्णालयात तातडीने पोहचले आणि मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली, धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितले. त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. दरम्यान सध्या तरी मुंडेंना काही धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले.







कार्यकर्त्यांची रुग्णालयात धाव
या घटनेची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांना पाहण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेतेमंडळींनी धाव घेतल्याचे समजते. मुंडे हे कार्यकर्तेप्रिय नेते असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली.


राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता युवा मोर्चामध्ये प्रवेश करून केली


धनंजय मुंडे हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चामध्ये प्रवेश करून केली. 2012 मध्ये त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांना विधान परिषदेचे सदस्य करण्यात आले. त्याच वर्षी त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली पण पंकजा, त्यांची चुलत बहीण आणि गोपीनाथ मुंडे यांची मुलगी यांच्याकडून त्यांना निवडणूकीत अपयशाचा सामना करावा लागला होता. 2019 मध्ये ते पुन्हा एकदा बीडच्या परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांच्या विरोधात होते आणि यावेळी त्यांनी विजय मिळवला.