Maharashtra Political Crisis :  सध्या महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदारांपाठोपाठ आता खासदारांचा ओढा हा शिंदे गटाकडे आहे.  शिवसेना नेत्या भावना गवळींनी पत्र लिहित एकनाथ शिंदेंना पाठींबा दिला आहे. 


भावना गवळी आपल्या पत्रात म्हणाल्या,  सद्यस्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थीतीमुळे आपण व्यतिथ झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आलेल्या संकटामुळे आपल्यासमोर खुप मोठे आव्हान असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनातही याची खंत आहे.




आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासाचे शिवसैनिकच आहेत.  त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा, अशी विनंती भावना गवळी यांनी केली आहे. 


वर्षा निवास्थानावर बुधवारी दुपारी शिवसेना खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चार खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. यामध्ये भावना गवळी, प्रताप जाधव, राजेंद्र गावित आणि श्रीकांत शिंदे अनुपस्थित होते.  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर श्रीकांत शिंदे बैठकीला अनुपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण यामध्ये आता आणखी तीन खासदारांची भर पडली होती.


दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.