मुंबई :  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी 7 वाजता ताज प्रेसेंडेंट हॉटेलमध्ये होणार आहे. एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्विकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


दरम्यान, आजच्या कार्यकारिणीतीत कामकाज प्रस्ताव सादर होतील. तसंच मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्याता आहे. यापुढे दिल्या जाणाऱ्या एबी फॅार्मवर कुणाच्या सह्या असतील हेही आजच्या बैठकीत ठरवलं जाईल. दरम्यान या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या वतीने शाखांसोबतच पक्ष आणखी मजबूत करण्यावर भर असणार आहे. याचसाठी कार्यकारणी बोलवण्यात आली असून विविध प्रस्ताव सादर करण्यात येतील.


कोणते निर्णय घेतले जातील



  • मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होईल

  •  महत्वाचे नेते सचिव ठरवतील

  • आगामी काळात एबी फॉर्मवर सह्या कुणाच्या असतील याचा निर्णय होईल

  •  ठाकरेसोबत असलेल्या आमदारांना व्हीप बजावण्यासाठी पत्र देण्यात येईल

  • घराघरात पोहचण्यासाठी प्रयत्न केले जातील


शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आता आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा आयोध्या दौरा पुढच्याच आठवड्यात नियोजित केला असल्याची माहिती मिळाली आहे. आयोध्या दौऱ्यावरून आल्यानंतर तेथील महंतांनी दिलेला धनुष्यबाण राज्यभर फिरवले जाणार आहे. 


एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. शुक्रवारी निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील एखनाथ शिंदे यांना मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.