Ahmednagar Hospital Fire : अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या प्रकरणात एक वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन नर्स आणि एक वॉर्ड बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे यांना अटक केल्याच्या विरोधात आता सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या शिंदे रुग्णालयात कायम स्वरूपी कर्मचारी नसतानादेखील त्यांना जबाबदार धरत कारवाई केल्याचा विरोध आता नेटिजन करत आहेत. 


6 नोव्हेंबरला अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली. या आगीत उपचार घेत असलेल्या 10 रुग्णांचा सुरुवातीला आणि नंतर उपचारादरम्यान 2 अशा एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकासह एक वैद्यकीय अधिकारी, तीन नर्स आणि एक वॉर्ड बॉय यांच निलंबन करण्यात आलं होतं. यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक असलेल्या चौघांपैकी एक वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे आहेत. विशाखा शिंदे या अस्थीरोग विभागात शिकणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. ज्या दिवशी ICU विभागाला आग लागली त्यावेळी शिंदे या कामावर होत्या. त्यामुळे शिंदे यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मात्र विशाखा शिंदे यांचे निलंबन आणि त्यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याची सांगत त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत.


परिचारिका संघटनेच्या सुरेखा आंधळे म्हणाल्या,"जिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि नर्सवर झालेल्या कारवाईविरोधात संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला शहरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. विशाखा शिंदे या विद्यार्थिनी असून ज्या कर्मचारीच नव्हत्या त्यांचे निलंबन चुकीच्या पद्धतीने झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने त्यांचं निलंबन परत घेतल्याचा बनाव केला असल्याचं परिचारिका संघटनेने म्हटलं आहे याबरोबरच घटनेला जबाबदार धरत नर्सचे केलेले निलंबन देखील मागे घेण्याची मागणी केली आहे". 


अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आग प्रकरणी आणखी एका रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मृतांचा आकडा 12 झाला आहे. 6 नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात ICU विभागाला आग लागून 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता तर 6 रुग्ण जखमी झाले होते. या 6 रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील लक्ष्मण सावळकर या 60 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या दुर्घटनेत एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


संबंधित बातम्या


Ahmednagar Hospital Fire : अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी चार जणांना अटक


Ahmednagar Hospital Fire Tragedy : चौघांचा आगीत होरपळून बळी, 6 रुग्णांचा धुरामुळे होरपळून मृत्यू


Ahmednagar Hospital Fire : आग विझली, राजकारण भडकलं; राष्ट्रवादी-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha