मुंबई : कोरोनानंतर आता पुन्हा एकदा इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 100 टक्के राबवण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय शिक्षण विभाग कडून जारी करण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून कोरोना काळामध्ये शाळा ऑनलाईन सुरू होत्या. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा अध्यायनाचा ताण कमी व्हावा यासाठी पहिली ते बारावी इयत्तेचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यात आला होता


कोरोनाचा काळ लक्षात घेता अगदी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षामध्ये सुद्धा अभ्यासक्रम 25 टक्‍क्‍याने कमी करण्यात आला होता. मात्र आता या वर्षीपासून म्हणजे शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता पहिली ते बारावी चा अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे 100 टक्के राबविण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या सूचना शिक्षण विभागाने आज शासन निर्णय काढून जाहीर केले आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते बारावी आणि विशेष करून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा यावर्षी पूर्ण असेल आणि त्यावर बोर्डाची परीक्षा देखील होईल. 


राज्यातील शाळांची पहिली घंटा वाजली
दोन वर्ष ऑनलाईन शिक्षणाच्या गराड्यात अडकेलेले विद्यार्थी पहिल्यांदाच जून महिन्यात शाळेत आले. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर ऑफलाईन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा 13 जून पासून सुरू झाल्या. पण विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं, असं शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटलं होतं.


यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होतं. कोरोना आणि त्यानंतर लॉकडाऊन यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावं लागलं. सध्या राज्यात कोरोनाच्या सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.