मुंबई: बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आम्ही सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असून आज संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. राष्ट्रीय विषयावर काही भाष्य करणार नाही असंही अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल असं अजित पवार म्हणाले. विधीमंडळाबाबत काही निर्णय असतील तर ते अध्यक्ष घेतील असं ते म्हणाले. अजित पवार म्हणाले की, एनडीएचे सरकार सत्तेत असताना 25 पक्ष सोबत होते, त्यानंत यूपीएचे सरकारही अनेक पक्षांनी मिळून बनले होते.
अजित पवार महाराष्ट्राच्या संदर्भात काही असेल तर ते बोलतो, बाकीचा राष्ट्रीय विषय असेल तर ते पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल बोलतील असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार म्हणाले की, गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रावर जी काही संकटं आली, त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून उद्धव ठाकरेंचा समावेश टॉपच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश होता. त्यामुळे या काळात महाविकास आघाडीने चांगलं काम केलं आहे.
साहेबांनी एखादं वक्तव्य केलं त्यावर आम्ही काही प्रतिक्रिया देणार नाही असं अजित पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे गटानं भाजप किंवा प्रहार पक्षात विलिन व्हावं- निलम गोऱ्हे
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात पेचप्रसंग उद्भवला असून त्यावर आता विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बंडखोरांची आमदारकी रद्द व्हायची नसेल तर त्यांनी कोणत्या तरी पक्षामध्ये विलिन व्हावं लागेल, त्यांना एकतीरल भारतीय जनता पक्षामध्ये किंवा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षामध्ये विलिन व्हावं लागेल असं विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांच्या गटाला आता शिवसेना हे नाव वापरता येणार नाही असंही त्या म्हणाल्या.