Maharashtra Reduced VAT : केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या घोषणेनंतरही मुंबईतील पेट्रोल- डिझेलचे दर कमी झाले नव्हते. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले त्यानंतर राज्य सरकारने आज  मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती व औरंगाबादमधील दर कमी केले असल्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने या संदर्भातील निवेदन प्रसिद्ध करून 21 मे पासून कपात लागू झाल्याचे स्पष्ट केले आहे


राज्य सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल  आणि डिझेल वरील मूल्यवर्धितकर कपातीनंतर 21 मे पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती व औरंगाबाद  महापालिका हद्दीत पेट्रोलचे दर  32 रुपये  90 पैशांऐवजी 30 रुपये 82 पैसे प्रतिलिटर झाले आहेत.   तर  डिझेलचे दर 22 रुपये 70 पैशांऐवजी 21 रुपये 26 पैसे इतके करण्यात आले आहे.






 


केंद्रानं अबकारी करात कपात केल्यानं देशात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आधीच महागाईच्या गर्तेत सापडलेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्रापाठोपाठ केरळ आणि राजस्थाननंही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रानेही हा निर्णय घेतला आहे 


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?


फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, लज्जास्पद! महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. इंधनाची मूळ किंमत,विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन,रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते.  त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे.