जालना : ओमायक्रोनची (Omicron) वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार अलर्ट झाले असले तरी लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण असू शकतं. यासंदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. दरम्यान, राज्यात बऱ्याच ठिकाणी शाळा सुरु झाल्यात, ज्या झाल्या नाहीत त्यांनी शाळा सुरू कराव्यात अशाच आमच्या सूचना राहतील असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, दर सोमवारी होणाऱ्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत लहान मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोससाठी केंद्राकडे आग्रह धरला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. याशिवाय राजकीय बैठका, मेळाव्याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे देखील राजेश टोपे यांनी म्हटलंय.
ओमायक्रोनची वाढती रुग्ण संख्या पाहता राज्यसरकार अलर्ट असल्याचं सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "परदेशातून आलेल्या 100 टक्के प्रवाशांचे स्क्रिनिंग केलं जात आहे. राज्यात जनुकीय तपासणी अर्थात जीनोमिक सिक्वेन्स तपासल्या जाणाऱ्या लॅब वाढवणार असून नागपूर आणि औरंगाबाद मध्ये नवीन लॅबची निर्मिती करण्यात येणार आहेत."
राज्यात लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण होईल, परिस्थिती पाहून व त्यावर लक्ष ठेवून, टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि केंद्रसरकारशी चर्चा करुनच लॉकडाऊनचा निर्णय होईल असं राजेश टोपे म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :