Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी काल रात्रीपासून आणि आज दिवसभरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलीय. या पावसामुळं हवेत गारवा येऊन शहरांमध्ये नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच या पावसाने काही ठिकाणी शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. 


पिंपरी चिंचवड शहरात तुफान पावसाची हजेरी
पिंपरी चिंचवड शहरात तुफान पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासूनच ढग दाटून आले होते. हलक्या सरीही कोसळत होत्या. पण दुपारी तीन नंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शहरवासियांची चांगलीच तारांबळ उडाली. हा अवकाळी पाऊस आहे की मान्सून दाखल झाला, याबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे.


सटाणा परिसरात कांद्यासह अन्य पिकांना फटका
नाशिक जिल्ह्यात आज अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील काही भागात 3 वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले होते. काल सुद्धा तालुक्यातील काही भागात पाऊस झाल्याने कांद्यासह अन्य पिकांना त्याचा फटका बसला..


साक्री तालुक्यामध्ये घरांवरील पत्रे उडाले
धुळे जिल्हातील साक्री तालुक्यामध्ये काल संध्याकाळी तब्बल एक तास  वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. तासभर चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्या मुळे शेतास तळ्याचे स्वरूप आल्याचे बघावयास मिळाले आहे.


गडचिरोली  : गडचिरोली शहरात मान्सुनपूर्व रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहरातील वातावरण थंड झालं आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता.  


रत्नागिरी जिल्ह्यातही वादळी पाऊस


रत्नागिरी जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.चिपळूण, खेड, दापोलीमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढला आहे.  पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा आला आहे तर बळीराजा सुखावला आहे.


नांदेडमध्ये शेतमालाचं मोठं नुकसान
नांदेड जिल्ह्यात आज सकाळी मान्सूनपूर्व पाऊस मुसळधार झालाय. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेली शेतकऱ्यांची हळद आणि इतर शेती मालाचे प्रचंड नुकसान झालेय. कृषी उत्पन्न बाजार समितीने रिकामे आणि बांधकाम सुरू असलेले सुरक्षित गाळे उपलब्ध करून दिले नाही, म्हणून हे नुकसान झाले असून या नुकसानीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.   नांदेड जिल्ह्यात आज सकाळी मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस बरसला. पावसाची तीव्रता एवढी होती की नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेला हळद आणि इतर शेती उत्पन्न माल अक्षरशः पावसात भिजला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे रिकामे गाळे असताना ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून न दिल्यामुळे वर्षभर राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या घामाचे उत्पन्न मातीमोल ठरलेय. त्याच प्रमाणे बाजार समितीतील शेतकऱ्यांचा आलेला माल ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले गाळे, काही व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे ताब्यात घेऊन त्यांचे गोदाम बनवल्यामुळे शेतकऱ्यांना माल उघड्यावर टाकावा लागत आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून शेतकऱ्यांच्या हक्काची जागा त्यांना मिळत नसेल तर आम्हला आमच्या पद्धतीने विचार करावा लागेल असा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिलाय.