CM and DCM Delhi Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर (Delhi Visit) जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज 'आझादी का अमृत महोत्सव' या बैठकीला हजेरी लावणार आहेत, तर रविवारी निती आयोगाच्या बैठकीमध्येही सहभागी होतील. या दोन दिवसांच्या दौऱ्यात दिल्लीतील नेत्यांशी गाठीभेटी घेऊन मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 


यंदा देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच रविवारी नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीलाही देशभरातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.


राज्यात नवीन सत्ता स्थापन होऊन एक महिना उलटून गेला तरी अद्याप मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळत नाही. त्यातच राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या 8 तारखेला महत्त्वाची सुनावणी आहे. या सुनावणीमुळे राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवण्यात येत नसल्याचं सांगितलं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. 


दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली होती, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार असल्याने यावेळी तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 


शिवसेना बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या 8 तारखेला यावर सुनावणी होईल. आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जातं की आणखी काही निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच विस्तार होण्याची शक्यता आहे.