Maharashtra Rainfall Update : राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने (Rain) दडी मारल्यामुळे यावर्षी बळीराजाची चिंता वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः मराठवाड्याला (Marathwada) याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. हवामान खात्याने 19 ऑगस्टनंतर पाऊस राज्यात पुन्हा हजेरी लावील अशी शक्यता वर्तवलेली आहे. जर पावसाने पुन्हा एकदा दडी मारली तर राज्याच्या अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यामध्ये अवघा 31.70 टक्के सरासरी पाणीसाठा आतापर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे जर पाऊस पडला नाही तर या पाणीसाठ्यात घट होऊन दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे राज्यभरात मागील वर्षी आजच्या तारखेत 79.63% पाणीसाठा होता. यावर्षी मात्र अवघा 61.16 टक्केपाणीसाठा आहे. त्यामध्ये मराठवाड्यात अतिशय कमी पाणीसाठा असल्याचे समोर आलं आहे.

राज्य सरकारचे काय प्रयत्न सुरू आहेत?

  • हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 ऑगस्ट नंतर राज्यात पाऊस पडला नाही, तर तात्काळ सर्व विभागाच्या बैठका घेऊन काय उपाययोजना करायच्या यावरती निर्णय घेतला जाईल.
  • ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पडला नाही, तर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना खते बी-बियाणे तयार ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत.
  • आतापर्यंत कुठल्या प्रकारची पाण्याची कपात करण्यात आलेली नाही. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 तारखेनंतर पाऊस सुरू झाला नाही. तर सर्व महत्त्वाच्या विभागांची बैठक घेऊन यावरती रणनीती आखली जाईल.
  • पाण्याचं वाटप करत असताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन, त्यानंतर शेतीसाठी आणि नंतर उद्योग धंद्यांसाठी प्राधान्य ठेवला जाणार आहे.
  • 19 ऑगस्ट नंतर पाऊस पडला नाही, तर विशेषता मराठवाड्यामध्ये पाण्याचे नियोजन कसं करायचं यावरती भर दिला जाईल. 

राज्यातील धरणांची सध्याची स्थिती! 

विभाग  मागील वर्षी पाणीसाठा यावर्षी वर्षी पाणीसाठा
नागपुर विभाग 76.41 टक्के  69.44
अमरावती विभाग 84.06 टक्के 63.98 टक्के
औरंगाबाद विभाग 72.35 टक्के 31.70 टक्के
नाशिक विभाग 72.23 टक्के 56.48 टक्के
पुणे विभाग 84.58 टक्के 67.99 टक्के
कोकण विभाग 84.95 टक्के 85.24 टक्के

पर्जन्यमान परिस्थिती!

  • 25 ते 50 टक्के पर्जन्यमान झालेले राज्यातील दहा तालुके आहेत.
  • 50 ते 75 टक्के पर्जन्यमान झालेले 98% तालुके आहेत.
  • 75 ते 100% पर्यंत पर्जन्यमान झालेले 142 तालुके आहेत.
  • 100% पेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले 105 तालुके आहेत.

राज्यात पेरणी किती झालेली आहे

आज पर्यंत राज्यभरामध्ये 136.30 लाख हेक्टर वरती पेरणी झालेली आहे. मागील पाच वर्षांच्यातुलनेत सरासरी 96% पेरणी झालेली पाहायला मिळते. सर्वाधिक पेरणी झालेले जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड आणि बुलढाणा आहे. तर, कमी पेरणी झालेले पाच जिल्ह्यांमध्ये सांगली, पुणे, गडचिरोली, रत्नागिरी आणि ठाणे आहे. पेरणी झालेल्या जिल्ह्यांपैकी 119% सोयाबीनची पेरणी झालेली आहे. तर 99% कापसाची पेरणी झालेली पाहायला मिळते. मागील पाच वर्षाच्या तुलनेमध्ये ज्वारी यावर्षी 39 टक्के, बाजरी 53%, मूग 44% उडीत 66%, भुईमूग ७१ टक्के पेरणी झालेली आहे. तर, पेरणी झाली असली तरी जर पावसाने दडी मारल्यास, दुबार पेरणी करावा लागेल. दुबार पेरणीनंतरही पाऊस पडला नाही तर मात्र बळीराजाला मोठ्या संकटाला सामोरं जावा लागेल

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nashik Rain : "या अल्लाह बारीश अताह फरमा"; मालेगाव शहरात मुस्लिम बांधवांकडून पावसासाठी विशेष दुवा पठण