Godavari Water Lavel : पावसानं पाठ फिरवली अन् संपूर्ण महाराष्ट्राचीच (Maharashtra News) दुर्दशा झालीये. राज्यभरातील अनेक धरणं, नद्या, तलावांना कोरड पडली असून अनेक ठिकाणी तर ऐक पावसाळ्यातच पाण्याची चणचण भासू लागली आहे. कुठे एक दिवसाआड, तर कुठे अगदी आठवड्यातून एकदाच पाणी मिळतंय. तर कुठे हंडाभर पाण्यासाठीही कित्येक मैलांची पायपीट करावी लागत आहे. पाण्याविना पिकं करपली, गेल्यावर्षीच्या अवकाळीचं ओझ्याखाली दबलेला बळीराजा आधीपासूनच संकटात सापडला आहे. अशातच आता पावसाअभावी उभ्या जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच पावसानं पाठ फिरवली आहे. मात्र, मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 


गोदामाई... जवळपास संपूर्ण मराठवाड्याची (Marathwada Rain Updates) तहान भागवणारी गोदावरी. जून गेला, जुलै गेला... आणि ऑगस्टही कोरडाच गेला. आता सप्टेंबरचा पहिला आठवडा उजाडला तरी राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात पावसानं दडी मारली आहे. पाऊस नसल्यानं खरीप पिकं वाळून गेली आहेत. दुसरीकडे धरणांमधला पाणीसाठाही कमी होत आहे. मात्र महत्वाचं म्हणजे मराठवाड्यातील नद्यांचं पात्र आद्यपही कोरडंच आहे. मराठवाड्याची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीचं विस्तीर्ण असलेलं पात्र आज पाण्याअभावी कोरडं पडलंय. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील लोकांसाठी त्यांची तहान भागवणारी गोदावरी म्हणजे, त्यांची गोदा माई. पण आज तिच कोरडी पडल्यानं मराठवाड्याच्या चिंचेत कमालीची भर पडली आहे. 




एबीपी माझानं गोदावरीच्या पात्राचा ड्रोन फुटेजमार्फत आढावा घेतला. संपूर्ण पात्रानं चक्क तळ गाठला आहे. तसेच, गोदावरीच्या संपूर्ण पात्रात पाणी शोधावंच लागतंय. हजारो जनावरं या कोरड्या पात्रातून पायपीट करत पाणी आणि चाऱ्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. तसेच गोदावरी कोरडी पडल्यानं गोदाकाठच्या अनेक गावांवर येत्या काळात पाणी टंचाई तसेच पिकांची परिस्थिती अत्यंत भयावह रूप धारण करणार हे आता निश्चित झालं आहे. 


सप्टेंबर उजाडला तरी पाऊस नाही, नद्यांची पात्र कोरडी पडली आहेत. मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भीषण होत असल्याचं दिसत आहे. पावसाचा जोर कमी असल्यानं राज्यातील सर्व प्रदेशांमध्ये पाणीस्थिती गंभीर बनली असून उजनी धरणात यंदा फक्त 17.54  टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.  मागील वर्षी याचवेळी उजनी धरण 100 टक्के भरलं होते. मराठवाड्यातील जलसाठ्यांची गंभीर स्थिती आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडीत यंदा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी जायकवाडीत 94 टक्के पाणीसाठा होता आहे. लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यांची गंभीर परिस्थिती आहे. भुसानी सोडता एकाही जलसाठ्यात 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा नाही.  भुसानीत आज 52.35  टक्के पाणीसाठा आहे.  हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी सिध्देश्वर आणि येल्दारी धरणात 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. मात्र यंदा सिध्देश्वर धरणात 46 टक्के तर येलदारीत 60 टक्के पाणीसाठा  शिल्लक आहे. 


राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत केवळ चारच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा


राज्यातील (Maharashtra) पिण्याची पाण्याची (Water) वणवण सुरुच आहे. जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आधीच असलेली तूट आणि वाढत जात असलेल्या तापमानामुळे राज्यातील धरणसाठे मागच्या वर्षीची सरासरी देखील गाठतील की नाही अशी चिंता आहे.  राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत केवळ चारच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे.  राज्यात मागच्या वर्षी  सप्टेंबर महिन्यात 16 धरणं  काठोकाठ भरली होती.