मुंबई : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Update ) पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे.
महाराष्ट्रातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रांकडून परिस्थिती आढावा घेत शास्त्रज्ञांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत उद्यापासून पावसाचा जोर वाढणार
मुंबईत 7 आणि 8 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर 9 आणि 10 ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
कोकणात अतिवृष्टी
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर 6 आणि 7 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 8 ते 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
विदर्भात 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यायत आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात 9 आणि 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.