Maharashtra Rain Update : राज्यात सोलापूर, लातूर, माढ्यासह वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावलीये. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून चाकूर येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुःखद घटना घडली आहे. शिवाजी नारायण गोमचाळे आणि ओंकार लक्ष्मण शिंदे असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
लातूर जिल्ह्यातील औसा, चाकुर, निलंगा तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धानोरा शिवारात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या भागा भुईसपाट झाल्या आहेत. औसा तालुक्यातील धानोरा शिवारात वादळी वाऱ्यामुळे शुक्राचार्य भोसले यांची तिन एकर केळीची बाग भुईसपाट झाली आहे. 6 च्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली जवळपास अर्धा तासांपेक्षा जास्त हे वादळ सुरू होतं. या वादळात अनेकांचे पत्रेही उडून गेले आहेत. मोठ्या प्रमाणात झाडही तुटून पडले आहेत.
वाशिममध्ये पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा
दिवसभर उष्ण वातावरणानंतर आज संध्याकाळच्या सुमारास वाशिम (Washim) जिल्ह्यात आज मालेगाव तालुक्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात का होईना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वाशीमसह बुलढाण्यातही सायंकाळी अचानक आलेल्या वादळामुळे व अवकाळी पावसाने आसलगाव येथे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचं मोठं नुकसान झालंय.
माढ्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, झाडं उन्मळून पडली
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळ प्रचंड नुकसान झालं आहे. माढा तालुका परिसरात साधारणत अर्धा तास तीव्र स्वरूपाचं वादळ होतं. समोरच काहीच दिसत नव्हत. यामध्ये मोठं मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. घरांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतीच्या पिकांच, जनावरांच, विजेच्या खांबांचं मोठं नुकसान झालं आहे. 30 ते 35 वर्षापासून असलेली आंब्याची झाडं डोळ्यादेखत उन्मळून पडली आहेत. इकडे किती नुकसान झालं हे शब्दात सांगू शकत नाही. सद्या सगळीकडे अंधार आहे. सकाळी नुकसानीची दाहकता किती आहे हे आणखी समजू शकेल.
सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात
सोलापुरात ढगांच्या गडगडाटसह सोलापूर (Solapur) शहर आणि परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर येथील अनेक घरावरचे पत्रे उडाले आहेत. जोरदार वादळी वाऱ्यामुळे दहा ते पंधरा घरांचे नुकसान झाले असून अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे.
पुढील 24 तासांत मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची शक्यता
पुढील 24 तासांमध्ये मुंबईसह उपनगरांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील 24 तासांत मुंबईतील तापमान 34 तर किमान तापमान 29 अंश राहिलं, असंही हवामान खात्याने नमूद केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या