मुंबई : पावसाळा संपला तोच पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं चित्र महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुढील पाच दिवस मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
समुद्रात वाऱ्यांचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही भागात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि अहमदनगरमध्ये पावसाचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे तर तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. ज्यात प्रामुख्याने उस्मानाबाद, बीड आणि लातुरात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. ज्यात चंदगड नेसरी भागात मुसळधार पाऊस होत असल्याची माहिती आहे. दरम्यान असं असलं तरी कापणी केलेल्या भाताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे आठवडी बाजारांमध्ये तारांबळ बघायला मिळाली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात बघायला मिळत आहे. दुसरीकडे उत्तर कोकणात देखील पावसाने हजेरी लावली आहे. पालघरमधील डहाणू तालुक्यात पाऊस बघायला मिळाला. ह्यात आशागड, गंजाडसारख्या परिसरात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला.
दरम्यान, ह्या पावसामुळे पालघरमधील भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहे. तिकडे आज दुपारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील येवला शहर आणि तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुमारे 15 ते 20 मिनिटे जोरदार हजेरी लावली. ऐन सणाच्या दिवशी अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक झालेल्या पावसामुळे कांद्याला फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या जरी काही भागात पाऊस दिसत असला तरी पुढील 8 दिवसांनंतर तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच थंडीची चाहूल जाणवणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून आधीच सांगण्यात आलं होतं.