मुंबई : मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून आजही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता अनेक ठिकाणी गुरुवारी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, पिंपरी-चिंडवड परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अतिमुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मुंबईनंतर ठाण्यातदेखील शाळांना सुट्टी जाहीर
ठाण्यामध्येही गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टी विचारात घेऊन तसेच हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने ठाण्यातील पहिली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर केली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी
पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जारी करण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ आणि विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
पालघरमध्ये रेड अलर्ट
पालघर जिल्ह्यामध्येही मुसळधार पाऊस सुरू असून गुरुवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत पावसाचा रेड अलर्ट
बुधवारी दिवसभर मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळच्या वेळी मात्र अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. तसेच त्याचा फटका मुंबईतील लोकल सेवेला बसला. त्यामुळे रात्रीच्या दरम्यान काही वेळेसाठी लोकल सेवा ठप्प झाली होती. परिणामी घाटकोपर आणि इतर अनेक स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा: