मुंबई : सत्तेत सामील होण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचे किस्से सांगितल्याचं म्हटलं जातंय. सत्तेत सामील होण्याआधी शाह यांच्यासोबत दहावेळा बैठका झाल्या. तसेच या बैठकीला जाताना ते मास्क आणि टोपी घालून जायचे, असंही खुद्द अजित पवार यांनी सांगितलं आहे. यावरच आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला आहे. सोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. राज्यात भाजपाचे राज्य नसताना एकनाथ शिंदे वेश बदलून अहमद पटेल यांना भेटायला जायचे, असा गौप्यस्फोटच राऊत यांनी केला आहे.
ते उत्तम पद्धतीन मेकअप करतात
यांचं महाराष्ट्रासंदर्भातलं कपट कधीपासून चालू होतं, हे तुम्हाला हळूहळू समजत असेल. महाराष्ट्राला रंगमंच किंवा नाटकाची फार मोठी परंपरा आहे. या महाराष्ट्राच्या मंचाने अनेक मोठे कलाकार दिलेले आहेत. महाराष्ट्रात नाट्यसृष्टीची एक परंपरा आहे. या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय. त्यांनादेखील यापुढे रंगमंचावर नाटकात सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण ते उत्तम पद्धतीन मेकअप करतात, उत्तम पद्धतीने चेहरे बदलतात. उत्तम पद्दतीने राजकारणातल्या फिरत्या रंगमंचावर काम करतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
या कलाकारांनी मराठी नाट्यसृष्टीत जायला हवं
अजित पवार एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकप्रमाणे नाव बदलून टोप्या बदलून, पिळदार खोट्या मिशा लावून अमित शाहांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री बारानंतर वेष बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईटखाली बसून सरकार कसं पाडायचं यावर चर्चा करायचं यावर चर्चा करत होते. लोक त्यांना ओळखत नव्हते म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला होता. म्हणूनच राजकारणातल्या या कलाकारांनी मराठी नाट्यसृष्टीत जायला हवं. त्यांनी आपल्या चित्रपटा पडद्याचं फार मोठं नुकसान केलंय, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली.
एकनाथ शिंदे अहमद पटेल यांना भेटायला जायचे
एकनाथ शिंदे खोट्या कथा लहून सिनेमे काढत आहेत. त्यांनी स्वत:वर नाटक रचलं होतं. त्यांना त्यावर सिनेमा लिहिता येत नसेल तर मी उत्तम लेखक आहे. मी लिहितो. मला प्रसंग जास्त माहिती आहेत. एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते अहमद पटेल यांनाही वेश बदलून भेटायला जायचे. केंद्रात काँग्रेसचे राज्य होते. तेव्हा ते शिंदे अहमद पटेल यांना कसे भेटायला जायचे, हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम पद्धतीने सांगू शकतात. अजित पवार हे तर काय उत्तम नट आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
हेही वाचा :
विधानसभेसाठी शिंदेंनी कंबर कसली; 46 प्रभारी, 93 निरीक्षकांची नियुक्ती, किती जागांवर असणार लक्ष?
धक्कादायक! दोन वर्षांच्या चिमुरडीसह आईने घेतली कृष्णा नदीत उडी, सातारा जिल्हा हादरला