Maharashtra Rain : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची (Farmers) पिकं वाया जात आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवस म्हणजे 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या पाच जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव साळुंके यांनी दिली आहे. 


ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह कोकण आणि नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता वर्तवलीआहे. त्यामुळं या चार जिल्ह्यातील धरणसमूहात जलसंवर्धन होवून धरणसाठा टक्केवारीतही वाढ होवु शकते. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.  


बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन वेळा नवीन चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली अस्तित्वात येऊ शकते. त्यातून कदाचित दोन्ही वेळा त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होवू शकते. त्यांच्या वायव्ये दिशेकडे भू-भागावर होणाऱ्या मार्गक्रमणामुळं, श्रावणी पोळ्यानंतर म्हणजे शुक्रवार 15 सप्टेंबर पासून आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 23 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.


एल निनोचा पावसावर परिणाम


प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या एल निनोमुळे भारतातील हवामानावर परिणाम होत आहे. सध्या भारतातील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. हा एल निनोचा प्रभाव आणि त्यामुळे भारताला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दक्षिण अमेरिकेतील पश्चिम किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास ‘एल निनो’ म्हणतात. याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला आहे. अनेक भागात पावसाची गरज आहे. मात्र, पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 


नंदूरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस, सातपुड्यात उगम पावणाऱ्या नद्यांना पूर 


महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं गेल्या चार दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये धडगाव अक्कलकुवा तळोदा तालुक्यात डोंगर रांगांमध्ये जोरदार पाऊस होत असल्यानं या ठिकाणी उगम पावणाऱ्या छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आले आहेत. या नदी नाल्यांवर असलेल्या छोट्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाला असून, हे बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत. चार दिवस झालेल्या समाधानकारक पावसामुळं पिकांना जीवदान मिळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यांमध्ये अजूनही वाढ झाली नाही. त्यासाठी अजूनही दमदार अशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे.


महत्त्वाच्या बातम्या: