मुंबई : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आहे. मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई आणि परिसर
मुंबईतही अनेक दिवसांपासून फक्त ढगांची गर्दी होती. मात्र आज पवई, वांद्रे, हिंदमाता, ठाणे, मुलुंड या भागात पाऊस झाला. अजूनही याठिकाणी अधून-मधून रिपरिप सुरु झाली आहे.
वसई आणि पालघरमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. पहाटे 4 ते 5 या दरम्यान जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळालं.
रायगड
रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन परिसरातही मुसळधार पाऊस पडला.
कोकण
रत्नागिरीसह कोकणच्या बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला आहे. तसेच, येत्या 24 तासात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काल रात्रभरही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पावसानं दमदार हजेरी लावली. काल झालेल्या पावसानं कोकणात लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
मालवण, वेंगुर्ला, राजापूरच्या ग्रामीण भागाला पावसाचा जोरदार फटका बसला. वेंगुर्ला आणि मालवणात खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान झालं. सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. सिंधुदुर्गात एक जूनपासून आतापर्यंत एक हजार 62 मीमी पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासात 22 पूर्णांक 75 मिलीमीटर पाऊस झाला.
सोलापूर
गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारलेल्या सोलापुरात काल मुसळधार पावसानं हजेरी लावली. ढगाळ वातावरण आणि जोरदार वाऱ्यासह पावसानं एंट्री घेतली.
विजांच्या कडकडाटासह शहरात पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं हवेत मात्र सुखद गारवा जाणवू लागला.
नाशिक-मनमाड
मनमाडसह नाशिकमध्येही पावसानं जोरदार बॅटिंग केली. शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागमध्ये जोरदार पाऊस झाला. आज दिवसभरातही नाशिक आणि परिसरात जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. उकाड्यापासून विश्रांती मिळाल्यामुळे नागरिक खुश झाले.