Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

Maharashtra Rain Live Updates : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं धुमाकळू घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Aug 2022 01:45 PM
Aurangabad: औरंगाबादच्या गंगापूरात मुसळधार पाऊस

Aurangabad Rain Update; औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. गंगापूर शहरात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे. तर वाळूज जवळील लिंबेजळगाव-तुर्काबाद परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सोबतच शहरात सुद्धा काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु, पंढरपूरसह 46 गावांना पुराचा धोका

उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं पंढरपूरसह 46 गावांना पुराचा धोका सांगण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आहे.  

नाशिकच्या आदिवासी बांधवांचा संघर्ष, नदीवर पूल नसल्यानं पुराच्या पाण्यातून प्रवास

Nashik Rain : नाशिकच्या आदिवासी बांधवांचा जगण्याचा संघर्ष दाखविणारा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पेठ सुरगाणामधून वाहणाऱ्या पार नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना नदी ओलांडण्यासाठी असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरुण लहान मुलांबरोबरच 75 ते 80 वर्षांच्या ज्येष्ठांनाही कमरे एवढया पाण्यातून नदी ओलांडावी लागत आहे. देश स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आदिवासींचे हाल संपण्याचं नाव घेत नाहीत. पेठ सुरगाणा याभागात पावसाचं प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यात नद्यांना पूर येतो. मात्र, जानेवारीनंतर पाण्याच्या शोधत भटकंती करावी लागत असल्याने बंधारा बांधून पाणी अडविण्याची आणि दळणवळणसाठी पूल बांधण्याची मागणी होत आहे.


 

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सांगली शहरातील काही कुटुंबांचे स्थलांतर

Sangli Rain : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पातळी 30 फुटांवर गेली आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर सांगली शहराच्या सूर्यवंशी आणि आरवाडे प्लॉट या पूर पट्ट्यामधील सहा कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. सूर्यवंशी प्लॉट मधील दोन घरात पाणी घुसले आहे. आणखीन पाण्याची पातळी वाढली तर सांगलीच्या विस्तारित भागात पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरपट्ट्यातील नागरिकांनी स्वतः हुन सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे, असे आवाहन महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी जनतेला केले आहे. पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धोका पत्करु नये असे आवाहन केले आहे.

अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, सावरकुटे येथील जोगेश्वरी विद्यालयाची इमारत भुईसपाट

Ahmednagar Rain : अकोले तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावर सर्वदूर पावसाचे तांडव सुरु आहे. वादळी पावसामुळं दुर्गम आदिवासी भागातील सावरकुटे येथील जोगेश्वरी विद्यालयाची इमारत रात्री भुईसपाट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला आहे. हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढत असून पावसाचा हाहाकार माजला आहे . रात्री झालेल्या पावसाने जोगेश्वरी विद्यालय, सावरकुटे अक्षरशः भुईसपाट केले. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने जीवितहानी टळली. मागील वर्षी संस्थेच्या व गावकऱ्यांच्या मदतीने आठवी, नववी व दहावीच्या वर्गासाठी वर्गखोल्या उभारल्या होत्या. सगळं अगदी व्यवस्थितपणे चालू होते. आठवी , नववी , दहावीचे विद्यार्थी भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत होते. पण वादळी पावसामुळं रात्रीच्या वेळेस शाळेची इमारत पूर्ण पडली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
कोल्हापूर पाऊस


गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली, तरी गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यांमध्ये पाऊस सुरुच आहे. शाहूवाडी तालुक्यामध्ये भूस्खलनची घटना झाल्यानंतर आता भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळून रस्ता पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे गगनबावडा चौकात बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, करुळ घाटातून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरु आहे. 


धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे आज दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. राधानगरी धरणाचे सध्या 3 दरवाजे (5,6,7) उघडे आहेत. यामधून 4 हजार 284 क्युसेक विसर्ग पाण्यातून होत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत राजाराम बंधाऱ्यावर स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर दोन दिवसांपासून ओसरल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत असली, तरी धोका पातळीला पोहोचलेली नाही. दुपारी 3 वाजता पंचगंगेची पातळी 41 फुट 7 इंचावर स्थिर आहे. आज दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट, तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील अजूनही 76 बंधारे पाण्याखाली आहेत. 


पुण्यातही पावसाची हजेरी


पुणे जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी 18 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळेच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ होऊन जिल्ह्याच्या विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील येडगाव, वडज, घोड, चिल्हेवाडी, कलमोडी, चासकमान, भामा आस्केड, वाडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुणे जिल्हातील पाण्याची समस्या संपण्याची शक्यता आहे. 


खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. सर्व धरणात चांगल्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरण  पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग करण्यात येणार आहे.भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. मुळशी धरण जलाशय पातळीत देखील वाढ झाली आहे. 


वीर आणि उजनी धरणातून विसर्ग सुरु


सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरण 100 टक्के भरल्याने भीमा आणि नीरा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून वाळवंटातील मंदिरात पाणी शिरू लागलं आहे. सध्या लागून आलेल्या सुट्ट्या आणि पवित्र श्रावण महिना सुरु असल्याने रोज हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत आहेत.


चंद्रभागेत स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन 


विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेच्या स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामुळे चंद्रभागेत पाय धुवून आणि पात्रात नौकानयन करून भाविक आनंद घेत आहेत. सध्या वीर धरणातून 33 हजार क्युसेक विसर्गाने नीरा नदीत तर 30 हजार क्युसेक विसर्गाने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या धरणात येणार पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने पाणी सोडण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


सांगलीत  कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ


सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी भागातील नागरिकांना स्पीकरवरून स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शिवाय कोयना धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे सांगली येथील आयर्विन नदीच्या पाण्याची पातळी 27 फुटांवर गेली आहे. महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरू करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना मनपा प्रशासनाकडून स्पीकरवरून दिल्या जात आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.