Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह परिसरात पावसाची जोरदार बँटिंग, तर काही ठिकाणी अद्याप प्रतीक्षा, 18 जूनपासून पावसाचा वेग वाढणार

Maharashtra Monsoon : राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jun 2022 01:16 PM
आसाममध्ये पूरस्थितीमुळं जनजीवन विस्कळीत, कामरुपमध्ये 70 हजाराहून अधिक लोकांना फटका

Assam Rain : आसाममध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथीलजनजीवन विस्कळीत झालं आहे. या स्थितीचा कामरुपमधील 70 हजाराहून अधिक लोकांना फटका बसला आहे. 



गेल्या 24 तासात चेरापुंजीत 972 मिमी पावसाची नोंद, भारतीय हवामान विभागाची माहिती

मेघालयातील चेरापुंजीत मागील 24 तासात 972 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. 122 वर्षात जून महिन्यातील तिसरी सर्वाधिक संख्या आहे.
आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरममध्ये पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 


चेरापुंजीतील पावसाचा मागील तीन दिवसातील आकडेवारी: 


१५ जून - ८१२ मिमी 
१६ जून - ६७४ मिमी 
१७ जून - ९७२ मिमी

या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात सगळीकडं मान्सून सक्रिय होणार

Monsoon News : राज्यातही हलका ते मध्यम पाऊस पडला असून, दक्षिण कोकणात थोडा जास्त पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात सगळीकडं मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी माहिती दिली आहे. 

आसाममध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत

Assam Rain : सध्या आसाममध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकणाचे रस्ते बंद आहेत. होजईमधील एकूण 40 हजार 856, नागाव जिल्ह्यातील 1 हजार 126 आणि कार्बी आंगलाँगमधील 1 हजार 908 लोक या मुसळधार पावसामुळं  बाधित झाल्याची नोंद झाली आहे.


 





बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, भोगावती नदीवरचा पूल दुसऱ्यांदा गेला वाहून

Buldana Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षी आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळं शेतीकामांना वेग आला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात मुळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं साखरखेर्डा येथील भोगावती नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस

Akola Rain : अकोला जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. यापवासामुळं बस स्थानकासमोरील नुकतेच वीस दिवसापुर्वी उद्घाटन झालेल्या अंडरपासनध्ये पाणी भरलं आहे. रात्रभरात झालेल्या पावसामुळे अंडरपासमध्ये कंबरभर पाणी भरलं आहे. या पावसानं कंत्राटदाराचं पितळ उघडं पाडलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यात कुडाळ, वैभववाडी, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. दिवसभर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी ऊन असं वातावरण होत. मात्र सायंकाळी पासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी 161 मि.मी. पाऊस झाला आहे. पुढील दोन दिवस कोकणात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 

 भिवंडी जोरदार पाऊस, तहसील कार्यालयात पावसानं पाणी गळती 

भिवंडीत जोरदार पाऊस सुरु झाल्यानं भिवंडी तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात पाणी गळती सुरु झाली. पावसाचे पाणी पडत असल्यानं काम बंद करण्यात आलं. कॉम्प्युटर व अधिकाऱ्यांच्या टेबलावर प्लास्टिक टाकण्याची वेळ आली. महत्वाची कागदपत्रे पाण्यात भिजण्याची शक्यता होती. संजय निराधार योजनेच्या लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. पावसाळ्यापूर्वी दक्षता न घेतल्यानं कार्यालयात पाणी गळती सुरु झाली आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अद्यापही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नाही. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दरदार हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, सांगली, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.


राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हेजरी लावली आहे. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.  


दरम्यान, सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, 18 जून 2022 पासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 


वाशिम जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी


वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात रात्री 3 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा, तालुक्यात  जरी पाऊस जास्त बरसला असला तरी मात्र कारंजा ,वाशिम ,तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यात कारंजा तालुक्यात पाऊस पडल्यानं आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.


बुलढाण्यातही चांगला पाऊस, खरिपाच्या पेरणीला होणार सुरुवात 


रात्री 2 वाजल्यापासून बुलढाण्यात चांगलाच पाऊस सुरु झाला आहे. जिल्ह्यातील नांदुरा, खामगाव, शेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला तर जळगाव जामोद, मलकापूर तालुक्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. पावसानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वतावरण निर्माण झालं आहे. आज पासून खरिपाच्या पेरणीला होणार सुरुवात होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.