Maharashtra Rain News : राज्यात दुष्काळाची (Drought) चाहूल लागली आहे. कारण बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं माना टाकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी चिंतेत आहे. अशातच भारतीय हवामान विभागानं (IMD) पाच किंवा आठ ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पावसाची गरज असतानाच परतीच्या हवामान खात्यानं मॉन्सूनच्या परतीच्या तारखांचा अंदाज वर्तवला आहे.
कोकण विभाग वगळता अन्य सर्व ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकण विभाग वगळता अन्य सर्व ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथं सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाची मोठी तूट
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत.
बाजरी, मूग, कपाशी, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट होणार
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील पाणी पातळी देखील घटली आहे. विहरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाऊस पडत नाही त्यात विहिरीत पाणी नसल्याने पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिला आहे. त्यात पाणी नसल्याने डोळ्यासमोर पिकं उध्वस्त होत असल्याने त्याला जगवण्यासाठी बळीराजा धरपड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करुन अडीच महिने झाले आहेत. पण अद्यापही चांगला पाऊस झाला नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी पीकं करपू लागली आहेत. कमी पावसामुळं बाजरी, मूग, कपाशी, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: