मुंबई : पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

राज्याच्या अनेक भागात हलका-मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Marathwada Rain Update : मराठवाड्यात विजांसह पाऊस

पुढील दोन दिवसात मराठवाड्याच्या काही भागात वीज आणि वादळांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान हवेचा वेग हा 30 ते 40 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे. 

Palghar Rain : पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत

पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मनोर-विक्रमगड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसंच, पासमाडजवळ रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान पालघर जिल्ह्याला आज सकाळपासूनच ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

 

Nashik Rain Update : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस 

नाशिकमध्ये सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे नाशिकमधील धरणात वेगानं पाण्याची आवक होत असल्यानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. गंगापूर धरणातून 6 हजार 160 क्यूसेक वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. गोदावरी नदीच्या पाणीपात्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 

लहान बोटींना समुद्रात न जाण्याच्या सूचना

कोकण किनारपट्टीला पु़ढील दोन दिवसात उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

ठाणे जिल्ह्यात पुरात वाहून एक व खड्ड्यामध्ये बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिह्यात नदीत वाहून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.