Accident News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad National Highway) घोडबंदर (ghodbunder) येथील जुन्या वर्सोवा पुलावर (old Versova bridge) आज दुपारी सुमारे 11.30 च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव टँकर लोखंडी ग्रीलचा कठडा तोडत थेट खाडीत कोसळला. या भीषण अपघातात टँकरचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संपूर्ण टँकर पाण्यात बुडाला आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर टँकर वसईहून ठाण्याकडे निघाला होता. दरम्यान, गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर टँकरने पुढे चाललेल्या लाकडांनी भरलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, चालक गोंधळून गेला आणि त्याने गाडीचं स्टेअरिंग वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटल्याने टँकर पुलाच्या कठड्याला धडकून खाली खाडीत कोसळला.
टँकर चालकाचा मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने टँकर उचलण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र, संपूर्णपणे पाण्यात बुडालेला टँकर बाहेर काढताना प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अपघातामुळे घोडबंदर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर पाण्यात बुडालेल्या टँकरच्या चालकाचा यात मृत्यू झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. आज सोमवारी (दि. 23) चिल्लर फाटा ते खानिवडे पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवासी, रुग्ण आणि वाहन चालकांना बसत आहे. प्रशासनाचे नियोजन नसल्यामुळे उलट्या दिशेने वाहन जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून महामार्गाच्या उड्डाणपूलांची कामे सुरू असल्याने देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
पिकअप पलटी होऊन महिलेचा जागीच मृत्यू
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील तांबेवाडी चौकाजवळ सोमवारी (दि. 23) एक भीषण अपघात झाला. नातेवाईकाच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी जात असताना पिकअप वाहनाचा ताबा सुटून गाडी पलटी झाली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त सर्वजण तांबेवाडी चौकातून भूमकडे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते. गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावर पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटला आणि गाडीने रस्ता सोडून पलटी घेतली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, उर्वरित सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तत्काळ बार्शी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आणखी वाचा
धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; गाडीसमोरच कार्यकर्त्यांच्या उड्या